मुंबईकरानो काळजी घ्या! 'या' भागात सर्वाधिक करोनामृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 2, 2021

मुंबईकरानो काळजी घ्या! 'या' भागात सर्वाधिक करोनामृत्यू

https://ift.tt/2Ybms12
म. टा. विशेष प्रतिनिधी ,मुंबई मुंबईमध्ये करोनामुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूंचे प्रभागवर विश्लेषण केले असता, अंधेरी पूर्व आणि भांडुप या दोन प्रभागांमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रभागांमध्ये प्रत्येकी एक हजारापेक्षा अधिक करोना मृत्यूंची नोंद झाली आहे. इतर प्रभागांमध्ये करोना मृत्यूंचा आकडा दीडशे ते आठशे या दरम्यान आहे. मात्र, काही प्रभागांमध्ये रुग्णसंख्या कमी असली, तरीही मृत्यूचा आकडा मोठा असतो. त्यामुळे मृत्यूदर हा इतर प्रभागांच्या तुलनेत किती आहे, यावरही अधिक लक्ष देण्याची गरज पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. पालिकेने दिलेल्या माहिनुसार, मुंबईत आतापर्यंत झालेल्या करोना मृत्यूंचा अभ्यास करता, अंधेरी पूर्व येथे एक हजार २६३, तर भांडुप येथे एक हजार ४५ जणांनी करोनामुळे प्राण गमावले आहेत. अंधेरी पश्चिमेत हा आकडा ७९४ आहे. तर बोरिवली येथे ९६८, कांदिवली येथे ८७५, मालाड येथे ९६७, परळमध्ये ६८९, मुलुंडमध्ये ५५२, ग्रॅण्टरोडमध्ये ६४८, गोरेगाव येथे ५६५, घाटकोपरमध्ये ८०६, दादर येथे ८३३ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. एलफिस्टनमध्ये ७१९, तर दहिसरला ५५२ मृत्यू करोनामुळे झाले आहेत. मरिन लाइन्स, कुलाबा आणि परळ या तीन प्रभागांमध्ये करोना मृत्युसंख्या ही इतर प्रभागांच्या तुलनेमध्ये कमी आहे. मरिन लाइन्समध्ये १९१, कुलाबा येथे २६४, तर परळमध्ये १७५ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या अंधेरी येथे २८९, तर भांडुप येथे १८० उपचाराधीन रुग्ण आहेत. सँडहर्स्ट, माटुंग्याकडे लक्ष सँडहर्स्ट रोड आणि माटुंगा या दोन्ही प्रभागांमध्ये करोना रुग्णवाढीचा साप्ताहिक दर हा इतर प्रभागांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. या प्रभागांमध्ये रुग्णवाढीचा साप्ताहिक दर ०.०९ टक्के इतका आहे. वैद्यकीय सुविधांची उपलब्धता महत्त्वाची करोना मृत्यूंच्या आकडेवारीचे प्रभागवार विश्लेषण करताना, संबंधित प्रभागामध्ये करोनाच्या लाटांच्या वेळी कोणत्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या, त्या किती जलदरित्या उपलब्ध झाल्या, ही माहिती महत्त्वाची असते. वेळीच वैद्यकीय उपचार उपलब्ध झाल्यास मृत्यू टाळता येऊ शकतात, याकडे रुग्णमित्र संघटनेचे आरोग्य कार्यकर्ते मोहन पाटील यांनी लक्ष वेधले.