श्रीनगरः जम्मू -काश्मीरच्या पूंछमध्ये सुरक्षा दलांची पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी चकमक उडाली आहे. या चकमकीदरम्यान एक ज्यूनियर कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि एक जवान जखमी झाला आहे. पूंछ जिल्ह्यातील मेंढरच्या नर खास जंगलात दहशतवादविरोधीत कारवाईदरम्यान एक जेसीओ आणि एक जवान गंभीर जखमी झाला आहे. दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अजूनही सुरू आहे, अशी माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली. या आठवड्याच्या सुरवातीला सोमवारीही सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यात भातीय लष्कराचा अधिकारी आणि ४ जवान असे एकूण ५ जण शहीद झाले होते. यातील तीन जवान हे पंजाबचे होते. पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागातील डोरा की गलीजवळ एका गावात झालेल्या चकमकीत हे जवान शहीद झाले होते. एलओसी ओलांडून दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती मिळाल्यावर संयुक्त मोहीम राबवण्यात आली होती. पूंछ जिल्ह्यात सुरक्षा दलांवर हल्ल्यात सामील असलेले दहशतवादी हे दोन ते तीन महिन्यांपासून या परिसरात होते, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुरक्षा दलांनी दोन आठवड्यांत १० दहशतवाद्यांना ठार केले आहे. सुरक्षा दलांनी पुलवामाच्या त्राल भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर शम सोफी याचा खात्मा केला.