बेंगळुरूः पंजाब आणि छत्तीसगडमधील पक्षातील गटबाजीने काँग्रेस हायकामांडची चांगलीच दमछाक झाली. आता कर्नाटक काँग्रेसमधील सुंदोपसुंदी एका व्हायरल व्हिडिओमुळे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटक काँग्रेसचे माध्यम समन्वयक एम. ए. सलीम आणि वरिष्ठ नेते आणि माजी खासदार व्ही. एस. उग्रप्पा यांच्यातील चर्चेचा एक कथित व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यामुळे राज्यातील सत्ताधारी भाजपला टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. व्हायरल व्हिडिओ कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्याशी संबंधित आहे. यामध्ये काँग्रेसचे दोन्ही नेते सलीम आणि उग्रप्पा आपसात कुजबुजत आहेत आणि डी. के. शिवकुमार यांच्यावर आरोप करत आहेत. पण व्हिडिओ खरा आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. डी. के. शिवकुमार हे १० टक्के लाच घेतात आणि त्यांच्या साथीदारांनी शेकडो कोटींची संपत्ती निर्माण केली आहे. शिवकुमार पूर्वी ६ ते ८ टक्के कमिशन घेत होते. पण आता त्यांनी कमिशन वाढवले असून १० ते १२ टक्के केले आहे. हा एक मोठा घोटाळा आहे. यात जितके जास्त खोलात जाल, तुम्हाला अधिक प्रकरणं दिसून येतील. डी. के. शिवकुमार यांच्या जवळचे असलेल्या मुलगुंडने ५० ते १०० कोटींची कमाई केली आहे. आणि मुलगुंडकडे इतकी मालमत्ता असेल, तर मग डी. के. शिवकुमारकडे किती असेल?, असा आरोप माध्यम समन्वयक सलीम यांनी केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ते हे बोलताना दिसत आहेत. शिवकुमार हे तोतरे बोलतात. हे कमी रक्तदाबामुळे होते की दारुमुळे माहिती नाही. आम्ही अनेक वेळा चर्चाही केली आहे. मीडियानेही विचारले आहे, असं व्हिडिओत ऐकायला येतं. या संपूर्ण व्हायरल व्हिडिओमध्ये सलीम आणि उग्रप्पा हे डी. के. शिवकुमार यांच्यावर दारू पिऊन, कमिशन घेतल्याचा आरोप करताना ऐकायला येतंय. भाजपने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. डी. के. शिवकुमार हे लुटारू असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. काँग्रेसमधील त्यांचेच नेते डी. के. शिवकुमार यांचं पितळ उघडं पाडत आहेत, अशी टीका भाजपच्या अमित मालवीय ट्विट करून केली आहे. व्हायरल व्हिडिओमुळे प्रकरण तापल्याने उग्रप्पा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सलीम हे भाजपच्या खोट्या आरोपांबद्दल बोलत आहेत. डी. के. शिवकुमार यांनी निर्माण केलेली मालमत्ता त्यांच्या व्यवसायामुळे आहे. ते टक्केवारीतील राजकारणी नाहीत. दरम्यान, काँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई करत सलीम यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. तर उग्रप्पा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दुसरीकडे, डी. के. शिवकुमार यांनीही आपली बाजू मांडली आहे. पक्षात गुठलीही गटबाजी नाही. या प्रकरणी शिस्तपालन समिती कारवाई करेल. याचा आपल्याशी किंवा पक्षाशी काहीही संबंध नाही, असं डीके शिवकुमार यांनी स्पष्ट केलं आहे.