
मुंबई : मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याचे नारे स्थानिक पातळीवर दिल्यानंतर काँग्रेसकडून आता याबाबत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या प्रस्तावासोबत पक्षाने आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयार केलेला एक अहवालदेखील सादर केला जाणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. पुढील वर्षाच्या सुरुवातीस मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई अध्यक्ष भाई जगताप, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेत्यांनी यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला होता. मात्र त्यानंतर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी स्वबळाच्या या चर्चेस पूर्णविराम दिला होता. मात्र नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या निवडणुकीत स्वबळावर लढल्याचा फायदा झाल्याचे दिसून आल्याने पालिकेची निवडणूकही पक्षाने स्वबळावर लढवावी, असे अनेक नेत्यांना वाटत आहे. या अनुषंगाने मुंबई काँग्रेसने आत्तापासून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे कळते. यासाठी पक्षातर्फे एक सर्वेक्षणही केले जात असून त्याचा अहवालही दिल्लीत पक्षश्रेष्ठींना सादर केला जाणार आहे.