पराभवाचा वचपा काढत न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत दाखल, इंग्लंडवर मिळवला दणदणीत विजय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 11, 2021

पराभवाचा वचपा काढत न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत दाखल, इंग्लंडवर मिळवला दणदणीत विजय

https://ift.tt/2YCeYVm
आबुधाबी : डॅरिल मिचेलच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने इंग्लंडवर थरारक विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडच्या संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मोइन अलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला न्यूझीलंडपुढे १६७ धावांचे आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले. त्यानंतर डॅरिल मिचेल आणि डेव्हॉन कॉनवे यांनी न्यूझीलंडसाठी अर्धशतकी भागीदारी रचली खरी, पण कॉनवे बाद झाल्यावर मिचेलने धडाकेबाज फलंदाजी सुरुच ठेवली आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. मिचेलला यावेळी जेम्स नीशामने चांगली साथ दिली. पण त्याला आदिल रशिदने बाद केले आणि त्यामुळे न्यूझीलंडच्या संघात चिंतेचे वातावरण होते. पण मिचेलने १९व्या षटकात दणदणीत षटकार लगावला आणि इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का दिला. इंग्लंडने २०१९च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडवर विजय साकारला होता. या पराभवाचा बदला यावेळी न्यूझीलंडने घेतला. मिचेलने यावेळी नाबाद ७३ धावांची खेळी साकारली आणि तो न्यूझीलंडसाठी मॅचविनर ठरला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना ५३ धावांमध्ये तंबूत धाडले. पण त्यानंतर इंग्लंडच्या डेव्हिड मलानने धडाकेबाज फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण न्यूझीलंडला वेगवान गोलंदाज टीम साऊथीने यावेळी मलानला बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. मलानने यावेळी ३० चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह ४१ धावांची खेळी साकारली. डेव्हिड मलानच्या रुपात इंग्लंडला मोठा धक्का बसला होता. पण त्यानंतर इंग्लंडच्या मोइन अलीने संघाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या षटकांमध्ये मोईनने न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर या सामन्यात मोइनने इंग्लंडसाठी सर्वाधिक धावाही केल्या. मोइन अलीच्या अर्धशकाच्या जोरावर इंग्लंडला पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडपुढे मोठे आव्हान ठेवता आले. मोइन अलीने यावेळी ३७ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ५१ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच इंग्लंडला न्यूझीलंडपुढे १६७ धावांचे आव्हान ठेवता आले.