संप करणाऱ्या ८५ हजारांहून अधिक एसटी कामगारांना आता 'ही' चिंता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 23, 2021

संप करणाऱ्या ८५ हजारांहून अधिक एसटी कामगारांना आता 'ही' चिंता

https://ift.tt/2ZeuNlr
म. टा. प्रतिनिधी । एसटी संपाचा तिढा दिवसेंदिवस वाढत असताना आता संपकरी कर्मचाऱ्यांना पगाराची चिंता भेडसावत आहे. 'काम नाही तर पगार नाही' अशी भूमिका महामंडळाची आहे. यामुळे संपात सहभागी झालेल्या ८५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना पगार मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. पगारातील अनियमितता सोडवणे आणि योग्य पगार मिळावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे, ही मागणी मांडली. याच मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 'करो या मरो' ही भूमिका घेत अनिश्चित काळापर्यंत संपाची हाक दिली आहे. संपकरी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे संस्थेविरुद्ध म्हणजेच महामंडळाच्या विरोधात आहे. अशा स्थितीत महामंडळाने पगार देणे म्हणजे संपाला अप्रत्यक्ष पाठिंबा देण्यासारखेच आहे. यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांना पगार देऊ नये, असा मतप्रवाह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आहे. वाचा: या संपात एकाच वेळी सर्व कर्मचारी सहभागी झालेले नाहीत. टप्याटप्याने आगारातील कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. यामुळे केवळ हजर दिवसांचा पगार कर्मचाऱ्यांचा खात्यात जमा केला जाईल, अशी चर्चा महामंडळात आहे. एसटी महामंडळात एकूण ९२,२६६ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या ८९,६८२ इतकी आहे. २५८४ कर्मचारी रोजंदारीवर आहेत. राज्यातील विविध आगारामध्ये अंदाजे अडीच हजार कर्मचारी प्रशिक्षणार्थी असल्याचे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा: संयुक्त कृती समितीने २७ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी उपोषण आणि २९ ऑक्टोबरपासून अघोषित संप अशी एसटी संपाची सुरुवात झाली. उपोषणाच्या दिवशी राज्यातील ८ आगार बंद होते. हळूहळू संपाची व्याप्ती वाढल्याने सध्या २५० आगार बंद आहेत. 'निर्णय झालेला नाही' प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला एसटी अधिकारी आणि कर्मचारी यांचा पगार थेट बँक खात्यात वळता केला जातो. संपकाळात कामावर हजर असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहेत. संपात सहभागी होत गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नसल्याचे महामंडळाकडून सांगण्यात येत आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची संख्या कार्यरत कर्मचारी - ९२,६६६ कायमस्वरूपी कर्मचारी - ८९,६८२ रोजंदारी कर्मचारी - २,५८४ (स्रोत - एसटी महामंडळ, ३० सप्टेंबर २०२१ अखेर)