
: जिल्हा परिषदेतील सभापती पदाच्या निवडणुकीत धक्का बसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या गोटात खळबळ उडाली असून या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी पक्षाकडून सोमवारी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. मात्र या बैठकीत पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. कारण बैठकीत आरोप-प्रत्यारोप झाले आणि जिल्हा परिषदचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले. तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे . अकोला जिल्हा परिषदेच्या दोन सभापतीपदाच्या निवडणुकीत यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला. जिल्हा परिषदेतील दोन्ही सभापती पदं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि अपक्षांच्या आघाडीला मिळाली आहेत. तसंच महिला आणि बालकल्याण सभापती पदावर बच्चू कडू यांच्या प्रहारच्या उमेदवार स्फूर्ती गावंडे यांना यश मिळालं. शिक्षण सभापतीपदावरही अपक्ष सम्राट डोंगरदिवे अविरोध विजयी झाले. या पार्श्वभूमीवर सोमवारी अध्यक्षांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांची मंथन बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत निवडणुकीत नेमकी कुठे चूक झाली, याबाबतच्या कारणांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, या बैठकीचा अहवाल पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पाठवला जाणार असून त्यानंतर प्रकाश आंबेडकरांकडून हलगर्जीपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.