मुंबई: मानखुर्द येथील मंडाळा भंगार बाजारातील गोदामांना भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवानं आगीत जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनेक गोदामं जळून खाक झाली आहेत. ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकलेलं नाही. पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १२ फायर इंजिन व १० टँकर्स घटनास्थळी पोहोचले आहेत. तब्बल १५० जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं दिली.