दिवाळी संपताच दापोलीत राष्ट्रवादीला धक्का; तालुक्यात राजकीय खळबळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 11, 2021

दिवाळी संपताच दापोलीत राष्ट्रवादीला धक्का; तालुक्यात राजकीय खळबळ

https://ift.tt/3n45POG
: पंचायत समितीच्या उपसभापती ममता शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या ममता शिंदे यांच्या राजीनाम्याने तालुक्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. ममता शिंदे यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा सभापती योगिता बांद्रे यांच्याकडे बुधवारी दुपारी सुपूर्द केला आहे. हा राजीनामा सभापतींनी मंजूर केल्यावर प्रशासनाकडे पाठवला जाईल आणि त्यावर शिक्कामोर्तब होईल. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत मंजुरीसाठी प्रशासनाकडे हा राजीनामा आलेला नाही. ममता शिंदे यांचा राजीनामा हा दापोली तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचं मानला जात आहे. हा राजीनामा केवळ घरगुती कारणास्तव दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र राष्ट्रवादीमधील एका नेत्याबरोबर झालेल्या वादामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भविष्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि या महाविकास आघाडीतील घटकपक्षांत रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या आणखी एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिल्याने दापोलीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उपसभापतीपदाचा राजीनामा देणाऱ्या ममता शिंदे या आगामी काळात नेमका काय राजकीय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.