मुंबई : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चर्चेत आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारकडून पूर्ण करण्यात याव्यात यासाठी मनसे अध्यक्ष यांनी पुढाकार घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरूनच राज ठाकरे यांनी मनसेच्या इतर नेत्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची त्यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट ( met ) घेतली आहे. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली. 'आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकर मिटावा आणि कामगारांच्या वेतनविषयक मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघावा यासाठी ही भेट होती. सुमारे तासभर झालेल्या चर्चेत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण आणि सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी हे प्रमुख मुद्दे होते,' असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या भेटीवेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे, सचिव हर्षल देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विलास अकलेकर, सरचिटणीस मोहन चावरे उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि राज ठाकरे एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सुरुवातीच्या काळात संघटनांनी संपे मागे घेण्याची घोषणा केली होती. मात्र केवळ वेतन वाढ आणि महागाई भत्ता या मागण्या महत्त्वाच्या नसून एसटी महामंडळाचं विलीनीकरण ही आमची प्रमुख मागणी आहे, असं म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरातील विविध आगारांमध्ये कामबंद आंदोलन सुरूच ठेवलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आल्या आणि या मुद्द्याबाबत त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे आगामी काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर काही तोडगा निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.