भाजपची खेळी शिवसेनेसाठी डोकेदुखी, राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार दिसल्यास रंगत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 29, 2022

भाजपची खेळी शिवसेनेसाठी डोकेदुखी, राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार दिसल्यास रंगत

https://ift.tt/2stN3ug
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता भाजपने राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी तयारी सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे. यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नसला तरी त्याचे सुतोवाच शनिवारी पक्षाकडून करण्यात आले. भाजपच्या या खेळीमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे तिसऱ्या जागेसाठी कोणाची निवड करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यासंदर्भात म्हणाले, 'राज्यसभा निवडणुकीसाठी तिसरा उमेदवार देण्याबाबत अद्याप पक्षाने निर्णय घेतलेला नाही. भाजप कोणतीही निवडणूक हरण्यासाठी लढत नाही. आम्हाला ज्यावेळी अंदाज येईल, त्यावेळी आम्ही विचार करू. सध्या आमच्याकडे ३१ मते आहेत. रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे कोटा ४१वर येईल. त्या परिस्थितीतही आम्हाला १० मतेच कमी पडत आहे. घोडेबाजार न करता आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो.' 'देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत अनेक मोठी कामे केली आहेत. त्यामुळे आम्हाला दहा मते सहज मिळतील. पण ही ३१ मते आणि इतर १० मते घेऊन तिसरी जागा लढायची की नाही याचा निर्णय अद्याप आम्ही घेतलेला नाही. याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व करते', असे चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अखेरची तारीख ३१ मे आहे. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होईल. जर यासाठी केंद्राने परवानगी दिली, तर आम्ही ही जागा निश्चितच जिंकून दाखवू, असा निर्धारही पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, दोन जागांपैकी पहिल्या जागेसाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे नाव निश्चित मानले जात असून, दुसऱ्या जागेसाठी भाजपमध्ये विनय सहस्रबुद्धे, राम शिंदे, अनिल बोंडे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.