राजस्थानने अखेरच्या षटकात विजय मिळवल्यामुळे गुणतालिकेत कोणते झाले मोठे बदल, जाणून घ्या... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 21, 2022

राजस्थानने अखेरच्या षटकात विजय मिळवल्यामुळे गुणतालिकेत कोणते झाले मोठे बदल, जाणून घ्या...

https://ift.tt/jemdrpx
मुंबई : राजस्थान रॉयल्सच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सवर अखेरच्या षटकात विजय साकारला आणि गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यापूर्वी राजस्थानच्या संघाचे १६ गुण होते. या विजयासह राजस्थानच्या संघाने आता १८ गुण झाले आहेत. सध्याच्या घडीला गुणतालिकेत राजस्थान आणि लखनौ या दोन्ही संघांचे समान १८ गुण झाले आहेत. पण राजस्थानने या विजयासह रनरेट चांगला राखल्यामुळे त्यांनी लखनौला पिछाडीवर टाकले असून दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता त्यांचा प्ले ऑफमधील समावेश पक्का झाला आहे. चेन्नईच्या १५१ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. कारण राजस्थानला दुसऱ्याच षटकात जोस बटलरच्या रुपात पहिला धक्का बसला, त्याला दोनच धावा करता आल्या. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन हा १५ धावांवर बाद झाला, तर देवदत्त पडीकल्ल हा तीन धावांवर तंबूत परतला. पण त्याचवेळी राजस्थानचा धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वाल हा दमदार फटकेबाजी करत होता. ३९ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि त्यानंतरही फटकेबाजी करत संघाला विजयासमीप पोहोचवले. जैस्वालने ४४ चेंडूंत ५९ धावा केल्या आणि मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. मोइन अलीने एकट्याने यावेळी चेन्नईचा किल्ला लढवल्याचे पाहायला मिळाले. मोइनला यावेळी अन्य खेळाडूंची चांगली साथ मिळाली नाही आणि त्यामुळेच चेन्नईच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पहिल्याच षटकात सलामीवीर ऋतुराज गायकवाड आऊट झाला आणि चेन्नईला मोठा धक्का बसला. ऋतुराजला यावेळी दोन धावाच करता आल्या. पण दुसरीकडे मोइन राजस्थानच्या गोलंदाजीवर तुटून पडत होता. मोइन अलीने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत फक्त १९ चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. अलीने ट्रेंट बोल्टच्या तिसऱ्या षटकात तर पाच चौकार आणि एक षटकारासह २६ धावांची लूट केली. त्यांनतर एकाबाजूने डेव्हॉन कॉनवे, एन. जगदीशन आणि अंबाती रायुडू बाद झाले. या गोष्टीचा मोइनच्या फटकेबाजीवर परीणाम झाला आणि त्याची फटकेबाजी मंदावली. दुसरीकडे फलंदाजीला आलेल्या चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला १३व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जीवदान मिळाले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने त्याला ३ धावांवर असताना झेल सोडला. पण या जीवदानाचा त्याला फायदा उचलता आला नाही, त्याला २६ धावा करता आल्या. अखेरच्या षटकांमध्ये मोइन बाद झाला आणि त्याचे शतक सात धावांनी हुकले. अलीने ५७ चेंडूंत १३ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ९३ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच चेन्नईला राजस्थानपुढे १५१ धावांचे आव्हान ठेवता आले.