पाटणा : राजकीय रणनीतीकार () यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. हे बुडतं जहाज असल्याची टीका त्यांनी केली आहे. प्रशांत किशोर यांनी आज बिहारच्या हाजीपूरमध्ये काँग्रेसमुळं माझं रेकॉर्ड खराब झाल्याचं म्हटलं. आता पुढील काळात काँग्रेससोबत काम करणार नसल्याचा मोठा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. प्रशांत किशोर यांनी २०१५ मध्ये नितीश कुमार यांना भेटलो. त्यांनी बिहारला बोलवून काम करण्यास सांगितलं. बिहारच्या विकासासाठी एक योजना सुरु करण्यात आली होती. त्यामध्ये काही युवकांना नोकऱ्या मिळाल्या मात्र मला अपेक्षित असलेल्या प्रमाणात त्या मिळाल्या नाहीत, असं प्रशांत किशोर म्हणाले. २०१७ मध्ये बिहारमध्ये महागठबंधन करुन निवडणूक लढवली, २०१७ मध्ये पंजाबमधील निवडणूक जिंकली. २०१९ मध्ये जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत काम केलं, तिथं त्यांची पार्टी विजयी झाली. २०२० मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काम केलं त्यांचाही पक्ष दिल्लीत विजयी झाला. २०२१ मध्ये तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये काम केलं. आम्ही ज्यांच्यासोबत काम केलं ते विजयी झाले. मात्र, २०१७ मध्ये एका निवडणुकीत आम्ही ज्यांच्यासोबत काम केलं तो पक्ष काँग्रेस होता. काँग्रेसला त्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. आता आम्ही पुढील काळात काँग्रेससोबत काम न करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रशांत किशोर म्हणाले. काँग्रेस सुधारणार नाही, आपल्या बुडवेल प्रशांत किशोर यांनी काँग्रेस स्वत: सुधारणार नाही आणि आपल्याला बुडवेल, असं म्हटलं. काँग्रेसबद्दल माझ्या मनात आदर आहे मात्र त्यांची सध्याची स्थिती सर्वांना माहिती आहे. २०११ पासून २०२१ मध्ये मी ११ निवडणुकांसबधी काम केली. त्यापैकी एका निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, असं प्रशांत किशोर म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत व्हावं लागलं होतं. तेव्हापासून त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. या लोकांनी माझं रेकॉर्ड देखील खराब केलं, असं प्रशांत किशोर म्हणाले. मात्र, पराभवातून खूप शिकता आलं,प्रशांत किशोर म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये भाजपसोबत एक पैज लावली होती. भाजपाचा पराभव होणार आणि त्यांना १०० पेक्षा कमी जागांवर विजय मिळणार असं सांगितलं होतं. जर, तसं न झाल्यास हे काम सोडण्याचं आव्हान दिलं होतं. मात्र, आम्ही भाजपला ७७ जागांवर रोखू शकलो, असंही ते म्हणाले. प्रशांत किशोर जनसुराज्य यात्रेची सुरुवात करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय रघुवंश प्रसाद सिंह यांच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी रघुवंश प्रसाद यांना आदरांजली अर्पण केली. प्रशांत किशोर यांनी स्थानिकांशी संवाद देखील साधला.