जे होईल त्याला सामोर जाणार, फडणवीस राज्यपाल भेटीवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 29, 2022

जे होईल त्याला सामोर जाणार, फडणवीस राज्यपाल भेटीवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

https://ift.tt/3GQmfZv
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह सेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकांचं सत्र सुरु होतं. देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत जाऊन अमित शाह, महेश जेठमलानी यांच्यासोबत कायदेशीर बाबींवर चर्चा केल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीतून मुंबईत परत आल्यानंतर राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार अल्पमतात असल्यानं बहुमत चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलीय. शिवसेनेकडून विनायक राऊत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही जे काय होईल त्याला आम्ही सामोरं जाऊ, असं विनायक राऊत म्हणाले आहेत. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय निर्णय घेतात हे पाहून निर्णय घेऊ, असं सचिन अहिर म्हणाले. विनायक राऊत काय म्हणाले? मला त्याबद्दल काही माहिती नाही. जे काय होईल त्याला सामोरं जाणार आहोत. जशी वेळ येईल त्याला आम्ही तोंड देऊ, असं विनायक राऊत म्हणाले. मुख्यमंत्री पदाधिकाऱ्यांशी भेटत आहेत. आमचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, योग्य वेळी त्यासंदर्भात माहिती दिली जाईल, असं विनायक राऊत म्हणाले. "माननीय राज्यपालांना आज ईमेलद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून भाजपने पत्र दिलेलं आहे. या पत्रात राज्यात आता जी परिस्थिती आहे, तिचा उल्लेख केलेला आहे. शिवसेनेचे ३९ आमदार बाहेर आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. याचा साधा अर्थ आहे, ते ३९ आमदार सरकारसोबत नाहीत. त्यामुळे सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाही. सरकारला बहुमत सिद्ध करायला लावावं, यासाठीचं पत्र आम्ही राज्यपालांना दिलेलं आहे" अशी माहिती फडणवीसांनी दिली. अखेर सत्ता संघर्षात भाजप समोर आलं एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बंडखोरीमध्ये भाजपचे नेते अप्रत्यक्षपणे सक्रीय असल्याचं दिसून येत होतं. संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे, प्रविण दरेकर यांचे पडद्यामागून शिंदे गटाच्या मदतीसाठी कार्य करत होते. आता देवेंद्र फडणवीस आता राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले होते.