झाडी... डोंगार... हॉटेलचा खर्च कोण करतंय?; बंडखोर आमदाराने स्पष्टच सांगितलं! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 27, 2022

झाडी... डोंगार... हॉटेलचा खर्च कोण करतंय?; बंडखोर आमदाराने स्पष्टच सांगितलं!

https://ift.tt/wn8ApPN
वृत्तसंस्था, गुवाहाटीः गुवाहाटीतील ज्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर नेते व त्यांचे समर्थक आमदार मुक्कामाला आहेत, त्याचा खर्च नेमके कोण करते आहे, यावर आता चर्चा सुरू झाल्या असताना, हा खर्च भारतीय जनता पक्ष करीत नाही, असे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या एका बंडखोर आमदाराची एक ध्वनिफीत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. 'मी सध्या गुवाहाटीत आहे', असे म्हणत, 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये आहे'... अशा शब्दांत आपली ख्यालीखुशाली संबंधित आमदार आपल्या एका कार्यकर्त्यास फोनवरून कळवत असल्याबाबतची ही ध्वनिफीत आहे. त्या पार्श्वभूमीवर, 'ही झाडी, हे डोंगार, या हॉटेल'चा खर्च नेमके कोण करीत आहे, याबाबतची विविधांगी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हा खर्च भारतीय जनता पक्ष करीत असल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र बंडखोर आमदारांच्या वतीने सातत्याने भूमिका मांडणारे आमदार दीपक केसरकर यांनी यात भाजपचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. 'आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी बोलावल्याने आम्ही येथे आलो आहोत. आमचा खर्च आम्ही करू', अशी बाजू मांडणारे ट्वीट केसरकर यांनी केले आहे. सात दिवसांचा खर्च ५६ लाख रुपये रॅडिसन ब्लू या आलिशान हॉटेलमध्ये सध्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी ७० खोल्या सात दिवसांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. या खोल्यांतील सात दिवसांच्या मुक्कामाचा खर्च साधारण ५६ लाख रुपये आहे, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. त्याशिवाय, वाढीव खाण्यापिण्याचा व इतर काही सेवांचा रोजचा खर्च ८ लाख रुपये आहे. या हॉटेलात एकूण १९६ खोल्या असल्या तरी तूर्तास हॉटेलने नवी बुकिंग घेणे थांबविले आहे, असे सांगण्यात आले.