लोकशाहीर, कवी प्रतापसिंग बोदडे यांचे निधन; आंबेडकरी चळवळीवर शोककळा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 4, 2022

लोकशाहीर, कवी प्रतापसिंग बोदडे यांचे निधन; आंबेडकरी चळवळीवर शोककळा

https://ift.tt/F4iGVSL
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : 'भीमराज की बेटी मै तो जयभीम वाली हूँ', 'महूँ के बच्चे में एक बच्चा', 'माझ्या भीमाची नजर' अश्या प्रसिध्द गीतांमधून उपेक्षित, वंचित समूहाला जागृत करण्याचे काम करणारे लोकशाहीर आणि भीमकुळाचे वारसदार (६७) यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रतापसिंग बोदडे मुंबई येथे रेल्वेतून निवृत्त झाल्यानंतर ते मुक्ताईनगर या मूळ गावीच राहत होते. आज शुक्रवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जळगाव येथे आणण्यात आले. दुपारी १२.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मित्र परिवारात प्रताप दादा म्हणून परिचित असलेले बोदडे यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. लोककवी वामनदादा कर्डक यांचे पट्टशिष्य असलेले प्रतापसिंग बोदडे यांनी भीमगीतांचे शेकडो कार्यक्रम सादर केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा गायक कुणाल बोदडे आणि तीन मुली, असा परिवार आहे. प्रतापदादांची शब्दांची फेक आणि गाण्याची लकब अप्रतिम होती. आंबेडकरांचं महान कार्य आपल्या लेखणीतून त्यांनी उपेक्षित वंचित घटकापर्यंत पोहोचवलं. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांनी प्रतापदादांची अनेक गाणी गायली. जयंतीच्या प्रबोधनाच्या जलश्यांना सुरुवात करताना आनंद-मिलिंद जोडी प्रतापदादांची आवर्जून आठवण करतात, त्यांचं विशेष नाव घेऊन त्यांची गीतं, कव्वाली सादर करतात. कोण होते प्रतापसिंग बोदडे ? प्रतापसिंग बोदडे हे आंबेडकरी चळवळीतले प्रख्यात गायक होते. त्यांचे वडील बामचंद बोदडे हे पूर्वीचे तमासगीर होते. प्रतापसिंग बोदडे यांचा जन्म जळगावच्या यावल तालुक्यातील बामनोद येथे झाला होता. त्यांच्या घरातच गाणं होतं. त्यामुळे गाणं लिहिण्यासाठी किंवा गाण्यासाठी त्यांना वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीत. लहानपणापासूनच बोदडे यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव होता. तसेच घरी गाणं असल्यामुळे आंबेडकरांचं कार्य आपल्या गायकीतून ते लोकांपर्यंत पोहोचवू लागले. दरम्यानच्या काळात लोककवी वामनदादा कर्डक यांचा सहवास त्यांना लाभला. त्यामुळे तमाशा नाकारून ते पूर्णवेळ आंबेडकरी चळवळ आणि गायकीच्या माध्यमातून प्रबोधनाकडे वळाले.