मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra)आणि मुंबईतील () वाढत्या करोना () रुग्णसंख्येमुळं पुन्हा एकदा चिंता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालीय. मंगळवारी मुंबईत ५०६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली होती. आज मुंबईत ७३९ म्हणजेच मंगळवारच्या तुलनेत ४६ टक्के नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, महाराष्ट्रात १०८१ नव्या करोना रुग्णांची नोंद झालीय. २४ फेब्रुवारीनंतरची महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्णसंख्या आज आढळली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत ७३९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील ही ४ फेब्रुवारीनंतरची सर्वाधिक रुगणसंख्या आहे. मुंबई महापालिकेनं यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. तर, गेल्या २४ तासात करोना संसर्गामुळं एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईत सध्या २९७० सक्रिय करोना रुग्ण आहेत. राजेश टोपे काय म्हणाले? महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आम्ही मुंबईतील करोना संसर्ग वाढीवर नजर ठेऊन आहोत. पुणे आणि ठाणे जिल्ह्यात काही भागात करोना रुग्ण वाढले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सध्या ४०३२ सक्रिय करोना रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या २९७० इतकी आहे. मुंबईत आतापर्यंत करोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या १० लाख ६६ हजार ५४१ वर पोहोचली आहे. तर, १९५६६ रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. मुंबईत ४ फेब्रुवारी रोजी ८४६ करोना रुग्णांची नोंद झाली होती. आज मुंबईतील धारावी देखील १० करोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे. त्यामुळं मुंबई पालिका प्रशासन सतर्क झालं आहे. महाराष्ट्रात बुधवारी करोना विषाणू संसर्गाच्या १०८१ रुग्णांची नोंद झाली आहे. २४ फेब्रुवारीनंतरची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासात करोना संसर्गामुळं एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. २४ फेब्रुवारीला महाराष्ट्रात ११२४ करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील करोना रुग्णसंख्या कमी होत होती. २४ फेब्रुवारीनंतर महाराष्ट्रातील करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्ण वाढत असल्यानं मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत दररोज रुग्ण वाढत आहेत, मान्सूनचा पाऊस लवकरच सुरु होईल त्या काळात करोना रुग्णांची संख्या वाढू शकते, असं ते म्हणाले. मे महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत करोना रुग्ण वाढत असल्याचं दिसून आलं आहे.