
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. झारखंडच्या माजी राज्यापाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी उमेदवारी जाहीर करताना आम्ही यावेळी पूर्व भारतातील आणि आदिवासी महिलेला संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. मुर्मू या ओडिशा राज्यातील आहेत. द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे. तर, दुसऱ्या महिला राष्ट्रपती होतील. यूपीएच्या काळात काँग्रेसनं प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदाव संधी दिली होती. द्रौपदी मुर्मू या ओडिशा राज्यातील आहेत. झारखंड राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. झारखंडच्या राज्यपाल म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ मध्ये झाला. मुर्मू या ओडिशा जिल्ह्यातील मयुरभंज जिल्ह्यातील आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्त्व करतात. सरकारी कार्यालयात त्या लेखनिक मधून कार्यरत होत्या. मुर्मू यांनी मोफत अध्यापनाचं काम केलं त्यानंतर त्या राजकारणात आल्या. भाजपच्या आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू २००० आणि २००९ मध्ये विजयी झाल्या. भाजपमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी २०१३ त २०१५ मध्ये काम केलं आहे.