म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई ः राज्य सरकारतर्फे उद्योगक्षेत्राला संपूर्ण प्रोत्साहन दिले जाणार आहे. वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रातील उद्योजकांनी महाराष्ट्रात यावे यासाठी सहकार्य केले जाणार असून महाराष्ट्र हे कायमच देशाचे विकास इंजिन राहिले आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा आणि प्रगतीचा साक्षीदार ठरेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबईत व्यक्त केला. हा महामार्ग लवकरच खुला केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आयोजित संकल्प ते सिद्धी परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर असे राज्य अशी या राज्याची ओळख असून ती कायम टिकविण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या पाच वर्षांत समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करण्याबरोबरच खालापूर ते सिंहगड येथे सर्वांत लांब बोगदा बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. या बोगद्यामुळे आता मुंबईहून पुण्याला जाताना वेळेची बचत होणार आहे. आजच्या काळात राज्याची प्रगती ही पायाभूत सुविधांचे जाळे किती विकसित आहे यावरून ठरते असे म्हटले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात रस्त्यांचे आणि पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे कायमच महत्त्वाचे योगदान आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रांत महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरवर नेण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे मत नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले. वरळी सी लिंकला नरिमन पॉईट आणि विरारशी जोडणाऱ्या प्रकल्पाचे काम सध्या केंद्र सरकारमार्फत सुरू असून हे काम महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला चालना देणारे ठरणार असल्याचेही ते म्हणाले. मुंबईची संपर्कयंत्रणा वाढणार... महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्प आणि योजना अंमलात येत असताना आणि एकात्मिक प्रगती साध्य करीत असताना त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यावर भर देण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प किंवा मुंबईसह अन्य शहरांतील प्रस्तावित मेट्रोसेवा यांसह बुलेट ट्रेनसारख्या नियोजित प्रकल्पांमुळे मुंबईची संपर्कयंत्रणा वाढणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि नावीन्याभिमुख बाबी एकत्र करून २०३० पूर्वी महाराष्ट्राला एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी नमूद केले.