'चांगल्या' रस्त्यामुळे वाढली महापालिकेची डोकेदुखी, गोराईतील 'हा' रस्ता बनतोय अपघातक्षेत्र - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 19, 2022

'चांगल्या' रस्त्यामुळे वाढली महापालिकेची डोकेदुखी, गोराईतील 'हा' रस्ता बनतोय अपघातक्षेत्र

https://ift.tt/5gHGrad
गोराई येथे गुळगुळीत पृष्ठभागामुळे अपघातांत वाढ म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईमध्ये पावसापाठोपाठच दरवर्षी खड्डेही डोके वर काढतात. या रस्त्यातून वाहने चालवताना कसरत करावी लागते. त्यामुळे दरवर्षी महापालिका टीकेची धनी होते. मात्र, गोराई परिसरात बांधलेल्या 'चांगल्या' रस्त्यामुळेही महापालिका अडचणीत आली आहे. या रस्त्याचा पृष्ठभाग इतका गुळगुळीत करण्यात आला आहे की, त्यामुळे या रस्त्यावर एकापाठोपाठ एक वाहने घसरून अपघात होत आहेत. बोरिवलीतील गोराई खाडीच्या पलीकडील भाग मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येतो. गोराई रोडवर पालिकेने नुकताच डांबरी रस्ता बांधला आहे. रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले असून, मुंबईत ठिकठिकाणी नवीन, जुन्या रस्त्यांवर खड्डे पडत असताना या रस्त्यावर खड्डे नाहीत. मात्र या रस्त्याचा पृष्ठभाग अतिरिक्त गुळगुळीत आहे. त्यामुळे त्यावरून ट्रक, टेम्पो, कार, दुचाकी अशा सर्व प्रकारची वाहने घसरत आहेत. या रस्त्यावर मुंबई महापालिकेचा औषध वाहतूक करणारा टेम्पो घसरून अपघात झाला. त्याशिवाय एका आठवड्यात जवळपास दहा वाहने घसरून अपघात झाले आहेत. या अपघातात वाहनचालकांना दुखापती झाल्या असून गाडीतील लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वॉचडॉग फाऊंडेशनचे विश्वस्त अॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे ई-मेल तक्रारीद्वारे केली आहे. पाहणीचे आदेश रस्ता चांगला बांधला तरी भूपृष्ठ योग्य नसल्यास वाहने घसरतात. रस्ते बांधणीसंबंधीच्या नियमावलीत भूपृष्ठ कसे असावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे, असे अॅड. पिमेंटा यांनी सांगितले. त्यांनी आयुक्तांना पाठवलेले पत्र आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना पाठवले आहे. या तक्रारीवर आयुक्तांनी पालिकेच्या अभियंत्यांना रस्त्याची पाहणीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती अॅड. पिमेंटा यांनी दिली.