वंशाचा दिवा म्हणून लाडात वाढवलेला मुलगाच उठला आईच्या जीवावर; पुण्यात घडली भयंकर घटना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 18, 2021

वंशाचा दिवा म्हणून लाडात वाढवलेला मुलगाच उठला आईच्या जीवावर; पुण्यात घडली भयंकर घटना

https://ift.tt/3n513z7
म. टा. प्रतिनिधी, दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे मुलाने दसऱ्याच्या दिवशी आईला हातातील कड्याने, सुरी आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना नऱ्हे येथील महालक्ष्मी अंगण सोसायटीत घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी खून करणाऱ्या मुलास अटक केली आहे. सचिन कुलथे (३१, रा. महालक्ष्मी अंगण, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे, तर विमल कुलथे (६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अनिता चिंतामणी (४४, रा. नऱ्हे) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि त्याची आई विमल कुलथे दोघे जण राहत होते. सचिनला दारूचे व्यसन आहे. यामुळे त्याची पत्नी त्याला वर्षभरापूर्वी सोडून माहेरी निघून गेली. चालक म्हणून काम करणारा सचिन गेल्या काही दिवसांपासून बेरोजगार होता. तो आईकडे व्यसनासाठी नेहमी पैशांची मागणी करीत होता. दारुसाठी पैसे न दिल्याने शुक्रवारी दसऱ्याला त्याने आईला सुरी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने बहिणीला याची माहिती दिल्याने ही घटना समोर आली. घटनेनंतर तो फरारी झाला होता. आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अनिता चिंतामणी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी त्याला स्वामीनारायण मंदिराजवळ असणाऱ्या टेकडी परिसरातील जंगलातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे तपास करीत आहेत. मुलासाठी केला होता नवस वंशाला दिवा हवा; म्हणून कुलथे कुटुंबीय आग्रही होते. सहा मुली झाल्यानंतर त्यांनी मुलगा व्हावा; म्हणून नवस केला होता. सहा मुलींनंतर सचिनचा जन्म झाला. एकुलता एक मुलगा म्हणून कुटुंबातील सर्वांनीच लाड केले. विमल कुलथे यांच्या पतीचे २०१५मध्ये निधन झाले. सचिनला दारूचे व्यसन असल्याने त्याला दारुसाठी पैसे हवे होते. मात्र, आईने पैशाला नकार देताच वंशाचा दिवा म्हणून आयुष्यभर लाडात वाढवलेल्या मुलाने पैशासाठी जन्मदात्या आईचा खून केला. आईने देऊ दिली नाही तक्रार घटस्थापनेच्या दिवशी तक्रारदार अनिता चिंतामणी आईला भेटायला माहेरी आल्या होत्या. त्या वेळी त्यांना आईच्या अंगावर वळ दिसले. त्यांनी चौकशी केल्यावर सचिनने मारहाण केल्याचे सांगितले होते. कोणालाही तो घरी येऊ देत नाही. त्याची आपण पोलिसांकडे तक्रार करू, असे तक्रारदार बहिणीने सांगितल्यावर 'मुलगा आणखी मारील,' म्हणून त्यांनी तक्रार करायला नकार दिला. 'तू सारखी येत जाऊ नको,' असेही त्यांना सांगितले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.