पाऊले चालती विजयाची वाट... तिसऱ्या दिवशी भारताकडे इंग्लंडविरुद्ध मोठी आघाडी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 4, 2022

पाऊले चालती विजयाची वाट... तिसऱ्या दिवशी भारताकडे इंग्लंडविरुद्ध मोठी आघाडी

https://ift.tt/0VGxDWR
बर्मिंगहम : भारतीय संघाने आता इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकण्याच्या दिशेने मोठे पाऊल तिसऱ्या दिवशी टाकले आहे. भारताने तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव २८४ धावांत सर्व बाद केला आणि त्यावेळी त्यांनी १३२ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने चेतेश्वर पुजाराच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चांगली धावसंख्या उभारली आहे. भारताने तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद १२५ अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण २५७ धावांची आघाडी आहे. चेतेश्वर पुजारा तिसऱ्या दिवसअखेर ५० धावांवर नाबाद खेळत आहे, तर रिषभ पंतने नाबाद ३० धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा निम्मा संघ ८४ धावातच तंबूत धाडल्यामुळे भारतास फॉलोऑन देण्याची संधी होती; पण इंग्लंडच्या अखेरच्या पाच विकेटनी भारताप्रमाणेच प्रतिकार केला. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात बेअरस्टोने भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला. कोहलीने सामन्यापूर्वी बेअरस्टोचा चेंडूंचा अंदाज कसा चूकतो याबाबत टिप्पणी केली होती. बेअरस्टोने याचे उत्तर दिले. त्याचा हा धडाका उपाहारानंतर कायम राहणार असेच वाटत होते; पण सिराजने इंग्लंडचे तळाचे फलंदाज जास्त त्रास देणार नाहीत याची खबरदारी घेतली. त्यामुळे भारताने पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा डाव ६१.३ षटकेच चालला; पण त्यांनी ४.६१ च्या सरासरीने धावा केल्या. त्यामुळे भारताला दुसऱ्या डावात किमान तीनशे धावा करण्याचे आव्हान असेल. दरम्यान, बेअरस्टोचा पवित्रा धक्कादायक होता. अवघ्या ११९ चेंडूत शतक केल्यानंतर बेअरस्टो खूपच सावध झाला. सकाळच्या सत्रात बुमराहने बेअरस्टोला वारंवार चकवले होते. बुमराहच्या चौथ्या यष्टीवरील चेंडूवरच अखेर बचाव करण्याच्या प्रयत्नात बेअरस्टो चूकला. सिराजने त्यानंतर शेपूट गुंडाळण्यास सुरुवात केली, त्यामुळे इंग्लंडच्या अखेरच्या तीन जोड्यांना ४३ धावांचीच भर घालता आली. त्यापूर्वी, सकाळच्या सत्रात बेन स्टोक्सचा झेल बुमराहने झेपावत घेतला. यापूर्वी बुमराहने स्टोक्सचा सोपा झेल सोडला होता. चार षटकांत सात चौकार वसूल केल्यानंतर इंग्लंडने ही विकेट गमावली होती. अर्थात बेअरस्टोने प्रतिहल्ला कायम ठेवला. त्यामुळे भारताची आघाडी कमी झाली. भारताच्या संघाला यावेळी पहिल्याच षटकात शुभमन गिलच्या रुपात पहिला धक्का बसला, गिलला यावेळी चार धावा करता आल्या. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांची दुसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी झाली. पण त्यानंतर हनुमा ११ धावांवर बाद झाला. हनुमा बाद झाल्यावर विराट कोहली फलंदाजीला आला आणि तो या डावात किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पहिल्या डावात कोहलीला ११ धावा करता आल्या होत्या. पण दुसऱ्या डावातही तो मोठी खेळी साकारू शकला नाही. कोहलीला दुसऱ्या डावात २० धावांवर समाधान मानावे लागले.