पुणेकरांना रक्षाबंधन पडले महागात; मागणी वाढल्याने कॅब कंपन्यांकडून प्रवाशांची लूटमार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 13, 2022

पुणेकरांना रक्षाबंधन पडले महागात; मागणी वाढल्याने कॅब कंपन्यांकडून प्रवाशांची लूटमार

https://ift.tt/WM9AGzS
म. टा. प्रतिनिधी, पुणे: रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी अचानक मागणी वाढल्यामुळे अॅपच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या कॅब कंपन्यांनी प्रवाशांची लूटमार केल्याचे दिसले. एरवी ज्या अंतरासाठी दीडशे ते दोनशे रुपये लागतात, त्या प्रवासासाठी नागरिकांकडून अडीचशे रुपये आकारले जात होते. मागणी जास्त असल्यामुळे सोयीचे नसेल तर भाडे लवकर स्वीकारले जात नव्हते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पुण्यात पीएमपीबरोबरच परवानाधारक रिक्षातून प्रवाशांना सेवा दिली जाते; तसेच खासगी कॅबचालक कंपन्यांकडूनदेखील अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा दिली जाते. दारात येऊन सेवा दिली जात असल्यामुळे या कॅबसेवेचा अनेक नागरिक फायदा घेतात. मात्र, या कॅब कंपन्यांच्या गाड्यांना मागणी जास्त असल्यास नागरिकांकडून नेहमी जास्त भाडे आकारले जाते. याबाबतचे वृत्त पूर्वीच 'महाराष्ट्र टाइम्स'ने दिले होते. त्याचा प्रत्यय गुरुवारी रक्षाबंधनाच्या दिवशी नागरिकांना पुन्हा आला. या कॅब कंपन्यांवर कोणाचे नियंत्रण नसल्यामुळे त्यांची मनमानी वाढली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी अनेकजण बहिणीकडे अथवा बहीण भावाकडे जाते. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढते हे लक्षात घेऊन पीएमपीने बसची संख्यादेखील वाढविली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. रक्षाबंधनाच्या दिवशी बाहेर पडलेल्या नागरिकांना कॅबचालक कंपन्यांच्या मनमानीचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून आले. सायंकाळी अचानक मागणी वाढल्यामुळे कॅब कंपन्यांकडून इतर वेळेपेक्षा थेट १०० ते १५० रुपये आकारले जात असल्याचे दिसून आले. सकाळी येताना १९० रुपये भाडे दिलेल्या मार्गावर सायंकाळी जाताना साडेतीनशे रुपये भाडे दाखवत होते; तर कॅबचालकांना सोयीचे भाडे नसल्यामुळे त्यांच्याकडून भाडे स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे नागरिकांना तासन्‌-तास कॅबची वाट पाहत थांबावे लागले. या कॅब कंपन्यांकडून होणाऱ्या लूटमारीवर आरटीओचे नयंत्रण नाही. त्यामुळे नागरिकांची सतत लूटमार सुरूच राहणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. 'आमच्या बाहेरचा विषय' रक्षाबंधनाच्या दिवशी मागणी वाढल्यानंतर अॅपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या रिक्षाला १०० रुपये; तर कारला १५० ते २०० रुपये जास्त आकारले जात असल्याचे गुरुवारी सायंकाळी दिसून आले. या कॅब कंपन्यांकडून अडचण व गरजेच्या वेळी वारंवार अशा पद्धतीने प्रवाशांची लूटमार सुरू आहे; पण याकडे कोणाचे लक्ष नाही. 'हा विषय आमच्या बाहेरचा आहे,' असे सांगून आरटीओ हात वर करीत आहे. तर, राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामध्ये प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मला सायंकाळी खराडी येथून फुरसुंगी येथे जायचे होते. त्यासाठी कॅब कंपन्यांच्या रिक्षासाठी ३६० रुपये भाडे दाखविले जात होते. सकाळी येताना याच मार्गावर १९० रुपयांमध्ये आलो होतो; तसेच बराच वेळ भाडेदेखील स्वीकारले जात नव्हते. त्यामुळे एक तासभर थांबावे लागले. - वैभव गरड, फुरसुंगी