देशाकडून खेळण्यापेक्षा खेळाडूंना लीग आवडतात भारी, ट्रेंट बोल्टनेही न्यूझीलंडचा करार नाकारला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 12, 2022

देशाकडून खेळण्यापेक्षा खेळाडूंना लीग आवडतात भारी, ट्रेंट बोल्टनेही न्यूझीलंडचा करार नाकारला

https://ift.tt/mljpoXh
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय सामन्यांऐवजी क्रिकेटपटू व्यावसायिक लीगना पसंती देत आहेत. हे केवळ वेस्ट इंडिजमध्ये घडत नसून, त्याचे प्रमाण अन्य देशांतही वाढत आहे. नुकतेच वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने ‘क्रिकेट न्यूझीलंड’सह करारबद्ध होणे टाळले. याला कारण म्हणजे त्याने लीगला पसंती दिली आहे. न्यूझीलंडच्या कसोटी विजेतेपदात आणि तीन वर्ल्ड कप उपविजेतेपदात बोल्टने मोलाची कामगिरी केली होती. त्यामुळे तो न्यूझीलंड संघातील प्रमुख खेळाडू आहे. बोल्टने कुटुंबास वेळ देण्यासाठी करार केला नसल्याचे सांगितले; पण ‘क्रिकेट न्यूझीलंड’ने लीग खेळण्यासाठी बोल्टने करार केला नसल्याचे सांगितले आहे. करोनामुळे क्रिकेटपटूंना सातत्याने जैव-सुरक्षीत वातावरणात राहाणे भाग पडत होते. त्याचा ताणही खेळाडूंवर आला होता. त्यामुळेही खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून स्वतःला दूर करीत असल्याचे मानले जात आहे. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने गेल्याच महिन्यात वन-डे क्रिकेटचा निरोप घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकने गतवर्षीपासून कसोटी न खेळण्याचे ठरवले. मात्र बोल्ट, स्टोक्स आणि क्विंटन हे आयपीएलमध्ये खेळले. त्याचबरोबर विविध टी-२० लीग खेळत आहेत. क्रिकेटपटू कुटुंबाकडे लक्ष देताना आर्थिक भविष्याचाही विचार करीत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय लढतींपेक्षा व्यावसायिक लीग जास्त आकर्षित करीत आहेत, याकडे क्रिकेट अभ्यासक लक्ष वेधतात. संयुक्त अरब अमीराती आणि दक्षिण आफ्रिकेत लवकरच होणाऱ्या लीगमुळे खेळाडूंसाठी जास्त पर्याय उपलब्ध झाले आहेत. अनेकजण जास्त पगारासाठी नोकरी बदलतात, मग खेळाडूंनी हेच केले, तर काय चूक आहे, अशीही विचारणा काही अभ्यासक करतात. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय लढतींकडे पाठ फिरवून लीगनाच पसंती दिली आहे. त्यामुळे बोल्टप्रमाणेच न्यूझीलंडचेही खेळाडूही याच प्रकारचा निर्णय घेतील, अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र, ‘क्रिकेट न्यूझीलंड’च्या डेव्हिड व्हाईट यांना हे मान्य नाही. आंतरराष्ट्रीय सामन्यात यशस्वी ठरल्यासच लीगसाठी चांगली किंमत मिळते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आयसीसीने जबाबदारी झटकलीआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत वाढत्या लीगबद्दल चर्चा झाली. मात्र, आयसीसीने ही जबाबदारी संलग्न देशांवर टाकली. प्रत्येक देशांच्या क्रिकेट बोर्डांनी आंतरराष्ट्रीय सामने आणि लीग लढतीचा समतोल साधायला हवा, असे सांगितले.