
बर्मिंगहम : भारताला आज रौप्यपदक मिळाले ते ज्युदो या खेळात. भारताच्या तुलिका मानला स्कॉटलंडच्या सारा अॅडलिंग्टनकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत दमदार विजय मिळवल्यावर तिच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण अंतिम फेरीत तिच्याकडून अधिक चांगला खेळ होऊ शकला नाही आणि त्यामुळेच तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पण रौप्यपदक पटकात तिने या स्पर्धेत इतिहास रचला आहे. कारण एकेरीतील तिने पटकावलेले हे पहिले पदक आहे. भारताच्या तुलिका मानने बुधवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ७८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत स्थान आणि पदक निश्चित केले होते. २२ वर्षांची तुलिकाने चार वेळा राष्ट्रीय जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तिने दमदार सुरुवात केली होती. पण तिला गुण मात्र मिळवता आले नाही. त्यामुळे ती पिछाडीवर होती. परंतु उपांत्य फेरीच्या सामन्यात तीन मिनिटांत न्यूझीलंडच्या सिडनी अँड्र्यूजला पराभूत करण्यासाठी 'इप्पॉन' कामगिरी केली. यापूर्वी भारताचा स्क्वॉशपटू सौरव घोषालने धडाकेबाज कामगिरी करत भारताला अजून एक पदक जिंकवून दिले. पुरुषांच्या सामन्यात सौरवने इंग्लंडच्या जेम्स विल्स्ट्रॉपवर दणदणीत विजय साकारला आणि भारताला कांस्यपदक पटकावून दिले होते. भारताच्या पूर्णिमा पांडेने हार मानली नाही. पूर्णिमाने वेटलिफ्टिंगच्या ८७ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये उतरून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. पूर्णिमाला पदक मिळवता आले नाही, पण तिने भारताचे नाव मात्र राखले होते.