‘एसी’मुळे साध्या लोकल ‘थंड’; मध्य रेल्वेवर विलंब आणि गर्दी वाढली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 16, 2022

‘एसी’मुळे साध्या लोकल ‘थंड’; मध्य रेल्वेवर विलंब आणि गर्दी वाढली

https://ift.tt/3FIiXGZ
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकल सुरू झाल्यापासून सातत्याने वादाची धनी झाली आहे. विलंबाने धावणे, धीमी लोकल पूर्वसूचना न देता जलद करणे, एसी लोकल रद्द असताना तिकीट विक्री होणे यामुळे दिवसागणिक प्रवाशांच्या संतापात भर पडत आहे. त्यातच एसी लोकलमुळे साध्या लोकलही विलंबाने आणि प्रचंड गर्दीने धावत असल्याने, वातानुकूलित लोकल म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. मुंबईतील घरांच्या किंमती परवडत नसल्याने मूळ मराठी कुटुंबे ठाणे आणि त्या पलीकडच्या शहरात स्थलांतरित झाली. नाशिक महामार्ग, पुणे महामार्ग, गुजरात महामार्गही ठाणे शहराला जोडतात. रेल्वेने ट्रान्स हार्बर, मेल-एक्स्प्रेस जोडणी असल्याने या स्थानकांत मोठी गर्दी पाहायला मिळते. गर्दीच्या ठाणे स्थानकातून अनेकदा एसी लोकल, कुर्ला लोकल, दादर लोकल अशा गाड्या एकामागोमाग धावतात. यामुळे सीएसएमटीला जाणाऱ्या प्रवाशांना अधिक काळ वाट पाहावी लागते. तीन लोकलचा भार एकाच लोकलवर येत असल्याने प्रचंड गर्दी होते. अशातच सीएसएमटी लोकल विलंबाने असल्यास प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण होते. यामुळे एसी लोकल फेऱ्या चालवताना रेल्वेने वेळापत्रकाचे नियोजन करणे आवश्यक आहे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. वातानुकूलित लोकल अनेकदा रद्द करण्यात येतात. प्रवाशांना याची माहिती प्लॅटफॉर्मवर आल्यावर मिळते. मात्र, लोकल रद्द केल्यानंतरही तिकीटविक्री सुरूच असते. रद्द केलेल्या गाडीचा परतावा देण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने करावी किंवा एसी लोकल रद्द असल्यास त्याचे तिकीट देऊ नये, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. रविवारी कार्यालयांना सुट्टी असल्याने अनेक प्रवासी सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी लोकल प्रवास करतात. पण रविवारी किरकोळ एसी लोकल धावत असल्याने पास आणि तिकीटधारक प्रवाशांना साध्या लोकलमधून प्रवास करावा लागतो, अशी खंतही प्रवाशांनी व्यक्त केली आहे. ‘पर्याय होऊ शकत नाही’ मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर साध्या लोकल फेऱ्या रद्द करून वातानुकूलित लोकल धावणार असल्यास त्याला प्रवाशांकडून तीव्र विरोध केला जाईल. एसी लोकल या अतिरिक्त स्वरूपातच चालवण्यात याव्यात. एसी लोकलच्या पासचे दर द्वितीय दर्जाच्या पासपेक्षा खूप अधिक आहेत. यामुळे साध्या लोकलच्या जागी एसी लोकल नकोच, अशी भूमिका मध्य रेल्वेवरील प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी घेतली आहे.