आजचा अग्रलेखः पदयात्रा आणि पडझड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 16, 2022

आजचा अग्रलेखः पदयात्रा आणि पडझड

https://ift.tt/izCjgPm
भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्ष जमेल तितका दुर्बळ करण्याचा पण केलेला दिसतो. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे. ती दीडशे दिवस चालणार असून १२ राज्ये तसेच दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. ही साडेतीन हजार किलोमीटर अंतराची यात्रा निवडणूक होऊ घातलेल्या गुजरातमध्ये जाणार नाही किंवा केंद्रीय सत्तेचे गणित ठरविणाऱ्या उत्तर प्रदेशात कमी काळ राहणार, याबद्दल पक्षात नाराजी आहे. दुसरीकडे, राहुल यांनी केरळला खूप जास्त दिवस दिल्याने तिथला सत्ताधारी मार्क्सवादी पक्ष नाराज आहे. हे चालू असताना गोव्यातील ११ काँग्रेस आमदारांपैकी आठ भाजपमध्ये गेले आहेत. तेथे दुसऱ्यांदा भाजप सरकार आल्यापासूनच काँग्रेस फुटणार असल्याची चर्चा होती. अखेर, काँग्रेसमधली पाच वर्षांतील तिसरी फूट पडली. गोव्यात पक्षांतर हे वेषांतराइतकेच सहज व नैसर्गिक असते. फक्त आता पक्षांतरबंदी कायद्यामुळे आवश्यक तितके आमदार गोळा करावे लागतात. राहुल गांधी यांच्या यात्रेवर लक्ष केंद्रित केलेल्या काँग्रेस नेत्यांना या घडामोडी समजत नव्हत्या का आणि त्या रोखण्यासाठी त्यांनी काय केले; या प्रश्नांना तर काही अर्थच राहिलेला नाही. कारण हाच प्रश्न ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापासून गुलाम नबी आझाद यांच्यापर्यंत सर्वांबाबत विचारता येईल. राहुल यांची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाली तेव्हा चंद्रशेखर यांच्यापासून कुणी कुणी पदयात्रा काढल्या आणि त्यातून राजकारणाला कसे वेगळे वळण लागले, याचे दाखले दिले गेले. ते उत्साह वाढविणारे असले तरी मुळात जो पक्ष शिल्लक आहे, राज्याराज्यात जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना टिकवून धरण्यात अपयश का येते आहे, याचा मुळातून विचार करण्यास काँग्रेसनेते तयार नाहीत. त्यामुळे, जयराम रमेश यांनी केवळ सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेऊन काय होणार? ‘इकडे तुम्ही यात्रा काढताय आणि तिकडे तुमचे आमदार निघून जात आहेत,’ असे कुणी म्हटले तर त्याला काय उत्तर देणार? विशेष म्हणजे, गोव्यात विधानसभा निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ‘मी आमदार म्हणून निवडून आलो तर पाच वर्षे काँग्रेसचे काम करीन. कोणत्याही स्थितीत पक्ष सोडणार नाही,’ अशी शपथ घेतली होती. उमेदवार मंदिरे आणि चर्चमध्ये जाऊनही हे म्हणत होते. मग त्यांनी आता सत्ताधारी बाकांवर उडी घेण्याचे कारण काय? याचा अर्थ, राज्या-राज्यांतले लोकप्रतिनिधी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्यात संवादाचा काही पूलच राहिलेला दिसत नाही. ‘वरिष्ठ नेते’ असे नुसते म्हणायचे. काँग्रेसमधील प्रत्येक लोकप्रतिनिधी किंवा नेत्याला ‘गांधी कुटुंब’ हेच पक्षाचे सर्वोच्च आणि खरे नेतृत्व आहे, हे माहीत असतेच. त्यांच्याशी संवाद न होता नेते असे पक्ष सोडत असतील तर केवळ या यात्रेतून पक्षाला नवी उभारी मिळेल का, हा प्रश्न गोव्यातील पक्षांतराने पुढे आला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार गेले, तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचा सत्तेतील जो काही वाटा होता, तो गेला. ठाकरे सरकार जाण्याच्या आधीपासूनच काँग्रेसचे किती आमदार फुटणार आणि भाजपमध्ये जाणार, याची चर्चा सुरू झाली. ती आजही चालू आहे. अनेक काँग्रेस नेत्यांच्या इन्कारात दम नाही. अशा अनेक प्रदेश शाखा अस्वस्थ किंवा अस्थिर असतील तर पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी पदयात्रेशिवाय बऱ्याच कल्पक गोष्टी वेगाने कराव्या लागतील. काँग्रेसला नवा, पूर्णवेळचा अध्यक्ष मिळणे, पक्षाची संघटनात्मक बांधणी तळातून नव्याने करणे आणि मुख्य म्हणजे देशभरातील छोटे नेते, कार्यकर्ते आणि सहानुभूतीदार यांचे मनोबल टिकविणे व मजबूत करणे; ही खरी आव्हाने आहेत. ‘भारत जोडो’ यात्रा ही आव्हाने पेलण्यासाठी पुरेशी आहे का, याचे आत्मपरीक्षण काँग्रेस नेत्यांनीच करायला हवे. राहुल गांधी यांच्या यात्रेचे स्वागत करतानाच अशी यात्रा डॉ. मनमोहन सिंग यांचे दुसरे सरकार असतानाच का निघाली नसेल, अशी शंका येते. पक्ष सत्तेत असतानाच तो अधिक मजबूत करायचा असतो, हे सध्या ठायी ठायी दिसणारे उदाहरण कळावे, इतके बुद्धिमान नेते काँग्रेसमध्ये तेव्हा होते आणि आजही आहेत. ज्या केरळमधून राहुल यांनी यात्रा सुरू केली आहे, तेथील ज्येष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांनी पक्षाच्या पराभवानंतर एक विस्तृत अहवाल दिला होता. त्यात अनेक महत्त्वाच्या सूचना होत्या. काँग्रेसचा ‘सेक्युलर तोल’ ढळला आहे का, असेही अँटनी यांनी त्यात नेमकेपणाने विचारले होते. या अहवालावर चर्चा झाली पण कृतीत काहीही आले नाही. आज पक्ष सावरण्यासाठी पदयात्रा हे एक पाऊल असले तरी पक्षाची पडझड रोखण्यासाठी ती पुरेशी आहे का, हा सवाल उरतोच. त्याचे उत्तर राहुल गांधी यांनाच द्यावे लागेल आणि तेही वेळ न दवडता. राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा निर्णय तसाच अर्धवट ठेवूनच पक्षाच्या कामात पुढाकार घेतला आहे. यातून तेच पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत, हेच अधोरेखित होते. असे असेल तर पुढे येऊन पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारणे आणि पक्षाला नवी दिशा देणे आवश्यक आहे. देशव्यापी पदयात्रा काढायची आणि अध्यक्षपद मात्र स्वीकारायचे नाही, यातला अंतर्विरोधही राहुल गांधी यांनी आता संपवावा.