
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः राज्यातील मॉलमध्ये वाइनविक्री सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य सरकारने याबाबत मागविलेल्या सूचना व हरकती प्राप्त झाल्या असून, त्याबाबत अभ्यास सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी गुरुवारी दिली. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा निर्णय मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. राज्यातील विक्री करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, त्यावेळी भाजपने या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. त्यावेळी तत्कालीन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, सरकार महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवायला निघाले असल्याची टीका केली होती. आशीष शेलार, सुधीर मुनगंटीवार या भाजप नेत्यांनीही मॉलमध्ये वाइनविक्रीला जोरदार विरोध केला होता. यासंदर्भात उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, ‘मॉलमधून वाइनविक्रीसंदर्भात लोकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. आता त्याची वर्गवारी करण्यात येत आहे. शहरी, ग्रामीण तसेच बाजूने आणि विरोधात अशी वर्गवारी करण्यात येईल. त्याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रीमंडळासमोर जाईन.’ ‘राज्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होते. पण ही द्राक्षे शेतकऱ्यांकडून थेट वायनरीकडे जात नाहीत. शेतकऱ्यांकडून द्राक्षे १० रुपयाला खरेदी केली, तर मध्यस्थ ती वायनरीला १०० रुपयांना विकतो. शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वत:चे वाइन यार्ड बनवावे व उत्पादन करावे,’ अशी आपली भूमिका आहे. याचा अर्थ सरकारच दारू उत्पादन व विक्री वाढवायला लागली असा होत नाही. पण फायदा हा कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचाच झाला पाहिजे, असेही देसाई म्हणाले.