'एनआयए'चे देशभरात छापे, PFIच्या १०६ पदाधिकाऱ्यांची धरपकड; काय आहे प्रकरण? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 23, 2022

'एनआयए'चे देशभरात छापे, PFIच्या १०६ पदाधिकाऱ्यांची धरपकड; काय आहे प्रकरण?

https://ift.tt/2l4PkBS
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी मुंबई-महाराष्ट्रासह, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आदी ११ राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक ठिकाणांवर छापे टाकले. ‘एनआयए’ने या राज्यांमधील 'पीएफआय'च्या राज्य आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांच्या कार्यालयांसह घरोघरी झडती घेतली. या कारवाईत तपास यंत्रणांनी शंभरपेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकून तब्बल १०६ जणांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईपैकी सर्वांत मोठी कारवाई केरळमध्ये करण्यात आली. केरळमध्ये २२ जणांना, तर महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रत्येकी २० जणांना अटक झाली. याशिवाय तमिळनाडू (१०), आसाम (९), उत्तर प्रदेश (८), आंध्र प्रदेश (५), मध्य प्रदेश (४), पुदुच्चेरी व दिल्ली (प्रत्येकी ३) आणि राजस्थान (२) अशा विविध राज्यांत ही कारवाई झाली. ‘एनआयए’ने देशभर एकाच वेळी केलेली ही पहिलीच मोठी कारवाई ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. अटकेच्या कारवाईबाबतचे अधिक तपशील जाहीर करण्यात आलेले नसून, ‘एनआयए’सह सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि संबंधित राज्य पोलिस दल यांनी १५ राज्यांत ही कारवाई केली. देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या घातपाती, तसेच समाजकंटकाकडून केलेल्या जाणाऱ्या आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या, पोलिस कारवाईमध्ये पकडलेल्या अनेकांचा संबंध कोणत्या ना कोणत्या प्रकारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी येत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अहवालातून समोर आले. या संघटनेच्या वतीने परदेशातून विशेषतः आखाती देशातून येणारा पैसा देशविघातक कृत्यांसाठी वापर जात असल्याची माहिती होती. पैशांचा स्रोत आणि त्याचा झालेला वापर याबाबत ईडीने सखोल चौकशी केली. यानंतर 'पीएफआय'च्या आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा लेखाजोखा केंद्रीय गृहमंत्रालयास देण्यात आला. ही संघटना देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर एनआयए आणि ईडीने देशभरातील १५ राज्यातील शंभरहून अनेक ठिकाणी छापे टाकले. यावेळी या यंत्रणांनी या राज्यातील स्थानिक तपास यंत्रणांना यात सहभागी करून घेतले. सर्व यंत्रणांनी मिळून एकाच वेळी हाती घेतलेल्या धाडसत्रामध्ये देशभरातून १०६ जणांना ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये छापेमारी केली. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड या चार ठिकाणी देशविरोधी कृत्य केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल करून २० पदाधिकारी आणि 'पीएफआय'शी संबधितांची धरपकड केली. मुंबई तसेच आसपासच्या परिसरातून शेख सादिक, मोहम्मद इकबाल खान, मझहर खान, मोमीन मिस्त्री, आसिफ खान या पाच जणांना अटक करण्यात आली. या पाच जणांना एटीएसने गुरुवारी संध्याकाळी सत्र न्यायालयात हजर केले. त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केली. मात्र, न्यायाधीशांनी सुनावणीअंती त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली. या राज्यांमध्ये छापेमारी केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल, बिहार आणि मणिपूर. राज्यात या ठिकाणी छापे राज्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. मुंबई, नाशिक औरंगाबाद आणि नांदेड येथे भादंविच्या विविध कलमांतर्गत (१५३ अ, १२१ अ, १०९, १२० ब) आणि यूएपीए कलम १३(१) (ब) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजात तेढ वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्यातील कलमे कलम १२१अ - देशाविरुध्द युध्द पुकारणे कलम १५३ अ - जात, धर्म समुहात तेढ निर्माण करणे कलम १०९ - एखाद्याला गुन्ह्याला मदत करणे यूएपीए कलम १३(१)(बी) - प्रतिबंधित कृत्य करणे कलम १२०बी - कट रचणे वादग्रस्त संस्था ‘पीएफआय’ ही अत्यंत वादग्रस्त संस्था आहे. या संस्थेचे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये मोठे ‘हब’ असल्याचे वृत्त काही संकेतस्थळांनी दिले आहे. महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाकडून इतर यंत्रणांना ‘अॅलर्ट’ देण्यात आला आहे. उमेश कोल्हे हत्याप्रकरणी ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’चा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिवसभरात.... - पीएफआय नेत्यांना अटक केल्याप्रकरणी आज, शुक्रवारी ‘केरळ बंद’ची हाक देण्यात आली आहे. - संघटनेतर्फे विविध शहरांमध्ये ‘एनआयए’विरोधात आंदोलन करण्यात आल्याचे वृत्त आहे. - केरळमध्ये सर्वांत मोठी कारवाई करण्यात आली. आरोप काय? - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनाला आर्थिक साह्य करणे, २०२०मध्ये झालेल्या दिल्ली दंगली भडकवणे, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दंगली घडविणे, अशा अनेक प्रकरणात ‘पीएफआय’विरोधात ईडी आणि इतर यंत्रणांकडून तपास सुरू होता. - ‘पीएफआय’ची स्थापना २००६मध्ये केरळमध्ये झाली असून, त्याचे मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. - अनेक वादग्रस्त घटनांशी संघटनेतील लोकांचे संबंध असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. कारवाईबाबत चर्चा नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. यात 'पीएफआय'च्या आवारात टाकण्यात आलेले छापे आणि दहशतवादी संशयितांवरील कारवाई यावर चर्चा झाल्याचे समजते. कुठल्याच जातीयवादाला सहिष्णुता नको कोची : सर्व प्रकारच्या जातीयवादाचा प्रतिकार केला पाहिजे. तो कादापिही खपवून घेता कामा नये, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. एनआयए आणि इतर तपास यंत्रणांनी पीएफआय कार्यालये आणि पीएफआय नेत्यांच्या घरांवर देशव्यापी छापे टाकल्याबद्दल पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना गांधी म्हणाले, 'सर्व प्रकारच्या जातीयवादाशी लढा दिला पाहिजे, मग तो कुठलाही असो. जातीयवादाबद्दल 'झिरो टॉलरन्स'चे धोरण असले पाहिजे आणि त्याचा प्रतिकार केला पाहिजे.'