
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः युवा सेनेच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ पाटील यांना धमकाविल्याप्रकरणी आमदार यांच्या कथित समर्थकांवर भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगर यांना आव्हान दिल्यानंतर अयोध्या यांना धमकाविण्यात आले होते आणि त्याबाबतची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. शिवसैनिकांनी गाडीला हात लावल्यास राजीनामा देईन, असे आव्हान शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी दिले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर अयोध्या यांनी बांगर यांना गद्दार म्हणत राजीनामा देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर बांगर यांचे समर्थक असल्याचे सांगत काहींनी त्यांना फोन केले. तसेच त्यांनी फोनवरून धमकी देताना अश्लील आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. त्यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या यांच्याशी संपर्क करून पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार भायखळा परिसरात राहणाऱ्या अयोध्या यांनी भायखळा पोलिस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार अर्ज दिला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यातील दोघे परिचयातील असल्याचे अयोध्या यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या अटकेनंतरच ते बांगर समर्थक आहेत की अन्य कुणी हे समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.