मुंबई पोलीस ग्रेट का आहेत विलास गुरव यांनी दाखवलं, जे केलं ते वाचून तुम्हीही सलाम कराल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 17, 2022

मुंबई पोलीस ग्रेट का आहेत विलास गुरव यांनी दाखवलं, जे केलं ते वाचून तुम्हीही सलाम कराल

https://ift.tt/JzPgRDH
मुंबई : महाराष्ट्राच्या पोलिसांनी करोना संसर्गाच्या काळात फ्रंटलाइनवर लढून त्या संकटातून राज्याला बाहेर काढताना महत्त्वाची भूमिका पार पाडली. मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर असून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे. मुंबई पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळं ओळखलं जातं. मुंबईतील अशाच एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील सहायक फौजदार विलास गुरव यांचा तो व्हिडिओ आहे. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याचा आवाज येताच त्यांनी जेवणाची सुट्टी असून देखील तत्परता दाखवत रुग्णवाहिकेला वाट करुन दिली.तो व्हिडिओ श्याम गुप्ता या व्यक्तीनं चित्रीत करुन ट्विटरवर पोस्ट करत पोलिसांचे आभार मानल्यानं सर्वांसमोर आली. सहायक फौजदार विलास गुरव यांच्या कर्तव्यनिष्ठेची कसोटी पाहणारी घटना १३ सप्टेंबरला घडली. गुरव हे वरळी नाक्यावर सेवा बजावत होते. जेवणाची सुट्टी असल्यानं ते जेवायला बसले होते. नेमक्या त्याचवेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेचा आवाज त्यांनी ऐकला. जेवण बंद करुन ते रुग्णवाहिकेला वाट करुन देण्यासाठी धावले. वरळी नाक्यावर ट्राफिकमध्ये अडकल्याचा आवाज आल्यानं विलास गुरव तातडीनं रस्त्यावर आले आणि सेवा बजावण्यास सुरुवात केली. आपले जेवण सोडून रुग्णवाहिकेला मार्ग दाखवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी विलास गुरव यांच्या जोडीला नव्हतं. मदतीसाठी कोणीही नसल्यानं एकट्यानं कार्य पार पाडलं. विलास गुरव यांनी रुग्णवाहिकेला मार्ग मिळावा म्हणून दोन सिग्नल बंद केले आणि वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिकेला वाट करुन दिली. विलास गुरव यांच्या कर्तव्यनिष्ठेनं त्या रुग्णवाहिकेतील रुग्णाला वेळीच रुग्णालयात पोहोचता आलं. विलास गुरव यांना निस्वार्थपणे कार्य करण्यासाठी त्यांना प्रेरणा कुठून मिळते असे विचारल्यावर त्यांनी वर्दीचा योग्य मान राखला गेला पाहिजे हे उत्तर दिलं. चांगले काम केल्यावर मनाला समाधान मिळते, असं ते म्हणाले. श्याम गुप्ता या नेटकऱ्याकडून व्हिडिओ चित्रित आणि ट्विट करण्यात आला. श्याम गुप्ता यांनी विलास गुरव यांच्या कामाला सलाम करत मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि वरळी पोलिसांचे आभार मानले आहेत. मुंबई वाहतूक पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडून देखील विलास गुरव यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे.