कांदिवली, मलाडमध्ये सिलिंडरच्या तुटवडाबाबात तक्रारी; पोलिसांनी शोध घेताच झाला मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 16, 2022

कांदिवली, मलाडमध्ये सिलिंडरच्या तुटवडाबाबात तक्रारी; पोलिसांनी शोध घेताच झाला मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

https://ift.tt/SEigftx
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः घरगुती गॅसच्या सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये भरून त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या टोळीचा चारकोप पोलिसांनी छडा लावला. कोणतेही प्रशिक्षण अथवा परवाना नसताना ही टोळी भररस्त्यात हा जीवघेणा उद्योग करीत होती. कांदिवली, मालाड परिसरात सिलिंडरच्या तुटवड्याबाबत तसेच इतर तक्रारी येऊ लागल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या टोळीकडून दोनशेहून अधिक सिलिंडर हस्तगत करण्यात आले. काही दिवसांपासून उत्तर मुंबईच्या काही भागांत घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत होता. त्यातच या सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री करून तसेच त्यातील गॅस काढून व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये भरले जात असून, या सिलिंडरची चढ्या दराने विक्री केली जात असल्याची माहिती चारकोप पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुधीर चव्हाण आणि दहशतवाद विरोधी कक्षाने इफ्का कंपनीसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या सिलिंडरच्या वाहनाजवळ छापा टाकला. यावेळी काही जण भररस्त्यातच घरगुती गॅसच्या सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून मांगीलाल बिष्णोई, श्रावण बिष्णोई आणि त्रिमूर्ती पेरुमल या तिघांना ताब्यात घेतले. या रॅकेटमध्ये या परिसरातील अधिकृत गॅस एजन्सीचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्याबाबतही चौकशी केली जात आहे. कोणताच परवाना नाही पोलिसांनी अधिक तपास केला असता, या तिघांकडे गॅसविक्रीचा किंवा गॅस भरण्याचा कोणताच परवाना आढळला नाही. नफा कमावण्यासाठी ही टोळी स्वतःसोबतच दुसऱ्यांचाही जीव धोक्यात आणत होती. या आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा, फसवणूक, दुसऱ्याच्या जीवितास धोका पोहोचविणे अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या टोळीकडून घरगुती आणि व्यावसायिक वापराचे दोनशे गॅस सिलिंडर, एक टेम्पो, रिफिलिंग करण्याचे मशिन, वजन-काटे तसेच इतर साहित्य हस्तगत केले.