
मनमाड, नाशिक : राज्याचं सध्या दुर्दैवं आहे. या राज्यातल्या अनेक गोष्टी काही दिल्लीला हलवल्या गेल्या. बऱ्याचशा गुजरातला ( ) हलवल्या गेल्या. मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी हे चाललेलं आहे, असं माध्यमांमधूनही बोललं जातंय. सगळं बघितल्यानंतर दुःख होतं. गुजरातींनी मुंबई मागितली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी. १०५ ते १०६ हुतात्म्यांनी मुंबईसाठी बलिदान दिलं आहे. पण एक एक करून अनेक गोष्टी मुंबई बाहेर चालल्या आहेत. आता मुंबईच घेतात की काय काही कळत नाही? असा सवाल उपस्थित करत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ( ) यांनी केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. मोठ मोठी वक्तव्य करण्याऐवजी मुख्यमंत्री ( ) आणि उपमुख्यमंत्री ( ) या दोघांनी पंतप्रधानांची तातडीने भेट घ्यायला हवी. राज्यात या प्रकल्पावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हे काही फार चांगलं नाही, असं पंतप्रधानांना सांगितल्यास उपयोग होऊ शकतो. यानंतर पंतप्रधानांनी सांगितल्यास हा प्रकल्प ताबडतोब पुन्हा महाराष्ट्रात येईल. पण पंतप्रधानांशिवाय कुणीही काहीही सांगितलं तरी हा प्रकल्प परत महाराष्ट्रात येणार नाही, असं मोठं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे. हाच नाही तर कुठलाही प्रकल्प, एखाद्या प्रकल्प त्यांच्या लक्षात आलाच तर तो गुजरातला जाऊ शकतो. त्यांना गुजरातमध्ये महामुंबई तयार करायची आहे. अनेक गेलेही तिथे. त्यांनी प्रयत्नही केला, पण ते उद्योग तिथून निघून गेले. जिओचा एक प्रकल्प होता अंबानींचा पण त्यांनी तो प्रकल्प तिरुपतीला हलवला, अशी परिस्थिती आहे. काही वेळेला उद्योगपतींनाही दिल्लीश्वरांचं ऐकावं लागतं, असं म्हणत छगन भुजबळ यांनी थेट पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला आहे. मुंबई आणि महाराष्ट्र प्रत्येकाला सोयीचा आहे. पाणी भरपूर आहे. जागा द्यायची तयारी आहे, वीज आहे, बंदरे आणि विमानतळ आहे. आणि याहीपेक्षा अभ्यासू आणि शिकलेले तरुण आहेत. हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहेत. हे सगळं काही इथे मिळत असताना गुजरातला जाण्याचं काही कारणचं नव्हतं. परंतु ते थोडं ( वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ) अदृश्य कारण आहे. पण हे अदृश्य कारण सांगता येत नाही. अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात. हे अदृश्य कारण दूर करायचं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पंतप्रधान मोदींना भेटावं. महाराष्ट्रात याबाबतीत मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे, असं पंतप्रधानांना सांगितल्यास प्रकल्प महाराष्ट्रात पुन्हा येऊ शकतो. फक्त हाच नाही तर कुठलाही प्रकल्प येऊ शकतो. पण त्यांनी पंतप्रधानांची भेटच घेतली नाही, तर तोपर्यंत काहीच होणार नाही, असं मोठं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे.