
उस्मानाबाद : खोके, पेट्या लाथाडून आम्ही निष्ठेने पक्षाबरोबर राहिलो, कारण गद्दारी आमच्या रक्तात नाही. मात्र जे गद्दारी करुन गेले, ज्यांनी राज्याचं सर्वोच्च पद मिळवलं त्यांना आपल्या फेसबुकचा कमेंट बॉक्स बंद करुन ठेवावा लागला आहे. अशा मुख्यमंत्रीपदाचा उपयोग काय?, अशी टीका उस्मानाबादचे खासदार यांनी केली आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १२ खासदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणं पसंत केलं. असं असलं तरी उद्धव ठाकरेंबरोबर १५ आमदार आणि ६ लोकसभा खासदार आहेत, ज्यात उस्मानाबाचे खासदार ओमराजे निंबाळकर पक्षप्रमुख यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. शिवसेनेतल्या बंडानंतर पक्षाला भगदाड पडलं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्षाचं मोठं नुकसान झालंय. अशावेळी शिवसेनेला सावरण्यासाठी स्वत: आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. उद्धव ठाकरे यांची देखील महाप्रबोधन यात्रा सुरु होत आहे. तत्पूर्वी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मराठवाडा दौऱ्याला कालपासून सुरुवात झाली. यावेळी घेतलेल्या मेळाव्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. मतदारांना मान खाली घालायची वेळ "आमदाराला विकत घेतल्याची भाषा आता होत असेल तर त्यांची विश्वासार्हता काय राहणार? एका अपेक्षेने मतदार लोकप्रतिनिधींना मतदान करतात, त्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते-पदाधिकारी जीवाचं रान करतात. मग तो आमदार-खासदार निवडून येतो. पण निवडून आल्यानंतर आमदार खासदाराच्या गद्दारीने मतदाराला देखील आता खाली मान घालायची वेळ आली आहे", असं ओमराजे निंबाळकर म्हणतात. तर त्या मुख्यमंत्रीपदाचा उपयोग काय? "उद्धव ठाकरे यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला अन् ते 'वर्षा'हून मातोश्रीकडे जायला निघाले तेव्हा आबालवृद्धांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यांच्या स्वागताला रस्त्याच्या दुतर्फा लोक जमले होते. अन् आताच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या सर्वोच्च पदी जाऊनही फेसबुकचा कमेंट सेक्शन बंद करावा लागत आहे", अशा शब्दात ओमराजेंनी यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील म्हणून भाजपने शिवसेना फोडली : वरुण सरदेसाई "उद्धव ठाकरे यांच्या करोना काळातील कामाची दखल सगळ्यांनी घेतली. ते कट्टर हिंदुत्ववादी असताना देखील त्यांनी दोन सेक्युलर पक्षांना सोबत घेऊन मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले. उद्या त्यांची लोकप्रियता अशीच वाढत राहिली तर २०२४ ला ते पंतप्रधानपदाचे दावेदार बनू शकतील, या भीतीनेच भाजपने शिवसेना फोडण्याचे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार घालवण्याचे काम केलं", असा दावा वरुण सरदेसाई यांनी केला.