काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार; पाठिंब्यासाठी शिवसेनेशीही बोलणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 28, 2022

काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार; पाठिंब्यासाठी शिवसेनेशीही बोलणार

https://ift.tt/IneWlAg
मुंबई: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या 'भारत जोडो यात्रे'च्या पार्श्वभूमीवर मुंबईतही पुढील आठवड्यात 'भारत जोडो यात्रा' काढण्यात येणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय शेकाप, सीपीआय, सीपीएम आणि जनता दलासह काही स्वयंसेवी संस्थाही यात सहभागी होणार असल्याचे मुंबई काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मुख्य म्हणजे या यात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेनेकडे प्रस्ताव देण्यात आला असून, लवकरच याबाबत अंतिम घोषणा केली जाणार असल्याचे समजते. देशभरातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्न लक्षात घेता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून 'भारत जोडो यात्रे'ला सुरुवात केली आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत निघालेल्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही मुंबई काँग्रेसच्या वतीने गांधी जयंतीला रविवार, २ ऑक्टोबर रोजी अशा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालयाशेजारील गांधी पुतळ्यापर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहेत. या यात्रेच्या आयोजनाबाबत नुकतीच एक बैठक मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यात मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील अनेक सामाजिक संस्थांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार अनेक संस्थांनी यात्रेला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येते. सामाजिक संस्थांप्रमाणे महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा पाठिंबा घेण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार मुंबई काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, तो मान्य करण्यात आला आहे. आम आदमी पक्षालादेखील यासंदर्भातील प्रस्ताव देण्यात आला असून, तेदेखील यासंदर्भात सकारात्मक असल्याचे समजते. मुख्य म्हणजे या यात्रेत शिवसेनेला सहभागी करून घेण्याची मागणी काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची शिवसेनेच्या नेतेमंडळींशी बोलणी सुरू असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येते. 'माकप'बाबत उत्सुकता 'भारत जोडो यात्रा' केरळमध्ये १८ दिवस सुरू असताना माकप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर बरीच टीका केली होती. उत्तर प्रदेशात यात्रा दोनच दिवस व केरळमध्ये १८ दिवस असे का, असा प्रश्न माकपकडून उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता माकप या यात्रेत सहभागी होणार का, याबाबत राजकीय क्षेत्रात उत्सुकता आहे.