
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः पूर्ण पाय नसल्याने गुडघ्यावर चालणाऱ्या एका तरुणाने दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात घडला आहे. मुलीला पळविण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, आशिक असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी हे सीटीसीटीव्ही फुटेज जारी करून हा आरोपी कुणाला दिसल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. वांद्रे परिसरात राहणारी दोन वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असताना, आशिकची नजर तिच्यावर पडली. त्याने गोड बोलून या मुलीला कडेवर घेतले आणि तो तिथून निघाला. बराच वेळ मुलगी न दिसल्याने घरच्यांनी शोधाशोध केली असता, ती कुठेच सापडली नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आशिक तिला उचलून घेऊन जात असल्याचे दिसले. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप आशिकचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वाचाः आशिक हा दोन्ही पायांनी अपंग असून, त्याला गुडघ्यापासून पाय नाहीत. तरीही तो गुडघ्यावर व्यवस्थित चालतो. आशिकला अमली पदार्थांचे व्यसन असून, तो भीक मागत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. धार्मिक स्थळे, बाजारपेठा, पर्यटन स्थळे किंवा नशा करण्यासाठी नशेबाज एकत्र जमतात अशा ठिकाणी आशिक येण्याची शक्यता असल्याने कुणाच्या नजरेस पडल्यास त्याची माहिती द्यावी, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. वाचाः