
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः ‘सीबीआयने माझ्याविरोधात भ्रष्टाचाराचा जो गुन्हा दाखल केला आहे तो ज्यांची विश्वासार्हताच नाही अशा व्यक्तींच्या जबाबांवर विसंबून आहे. परमबीर सिंग व सचिन वाझे यांनी स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी संगनमत करून मला या प्रकरणात गोवले. वाझे हा स्वत:हूनच रेस्टॉरंट अँड बार मालकांकडून खंडणी वसूल करत होता, हे दाखवणारे अनेक पुरावे आहेत’, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री यांनी विशेष सीबीआय न्यायालयात गुरुवारी दाखल केलेल्या जामीन अर्जात केला. न्या. एस. एच. ग्वालानी यांनी या अर्जाबाबत उत्तर दाखल करण्याचे निर्देश सीबीआयला देऊन १४ ऑक्टोबरला सुनावणी ठेवली आहे. ‘देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा दुरुपयोग करत सचिन वाझे व अन्य कनिष्ठ अधिकाऱ्यांना रेस्टॉरंट अँड बार मालकांकडून शंभर कोटी रुपये खंडणीवसुलीचे लक्ष्य दिले होते’, असा गंभीर आरोप परमबीर यांनी मुंबई पोलिस आयुक्त पदावरून गच्छंती झाल्यानंतर केला होता. याबाबत उच्च न्यायालयाने प्राथमिक चौकशीचे आदेश दिल्यानंतर सीबीआयने चौकशीअंती एफआयआर दाखल केला. या एफआयआरच्या आधारे सक्तवसूली संचालनालयानेही (ईडी) देशमुख यांच्याविरोधात पीएमएलए कायद्यांतर्गत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी सशर्त जामीन मंजूर करून तो आदेश १३ ऑक्टोबरपासून लागू होईल, असे स्पष्ट केले. या आदेशानंतरच त्याचा आधार घेत देशमुख यांनी अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत सीबीआय प्रकरणात जामीन अर्ज केला आहे. ‘सचिन वाझे हा १६ वर्षे निलंबित असताना त्याला अचानक मुंबई पोलिस दलाच्या सेवेत पुन्हा रुजू करून घेण्यात आले. त्यानंतर तो तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा लाडका पोलिस अधिकारी झाला. दोघांनी माझ्याविरोधात अत्यंत खोटे जबाब नोंदवले. वास्तविक स्वत:ची कातडी वाचवण्यासाठीच त्यांनी संगनमताने मला यात अडकवले. विशेष म्हणजे देशातील सर्वोच्च तपास संस्था असल्याचा दावा करणाऱ्या सीबीआयने निष्पक्षपणे व पारदर्शकपणे काम करणे अभिप्रेत असताना पक्षपातीने काम केले. जो या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे, त्या सचिन वाझेलाच या तपाससंस्थेने माफीचा साक्षीदार केले. यावरूनच माझ्याविरोधातील आरोपांत किती तथ्य आहे ते स्पष्ट होते. सीबीआय हे विशिष्ट हितसंबंध असलेल्यांचे निव्वळ कळसूत्री बाहुले झाले आहे. ईडीच्या प्रकरणात मला जामीन मंजूर करताना जी महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत त्यांचाही सीबीआय न्यायालयाने विचार करावा’, असे म्हणणे देशमुखांनी अर्जात मांडले आहे. तसेच विविध आजारांनी ग्रस्त असल्यानेही आपण जामिनासाठी पात्र ठरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.