
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं अंतरिम निर्णय देत असताना शिवसेना हे नाव वापरण्यास आणि धनुष्य बाण चिन्ह वापरण्यास दोन्ही गटांना मनाई केली आहे. उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहिलेले खासदार अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. या सगळ्या प्रकरणात केंद्रीय ज्या पद्धतीनं वागलाय ते पाहता तो वेठबिगार झाला आहे. कुणीतरी तक्रार केली त्याची छाननी केली नाही, आम्ही कागदपत्रं दिली त्याची छाननी नाही, कुणाच्या आदेशानं वागताय, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु आहे. हा निर्णय धक्कादायक आहे. कुणीही काहीही सांगेल आणि तुम्ही निर्णय घेता. शिंदे गटाचा एक माणूस सांगतो पाच वर्ष निर्णय लागणार नाही, हे कशाचं द्योतक आहे. महाराष्ट्र सगळे डोळं उघडे ठेवून पाहतोय. जितका त्रास द्याल तितका महाराष्ट्र पाहतोय. हिंदूह्रदयसम्राट शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली पक्षप्रमुख यांनी पक्ष पुढं चालवला आहे, असं अरविंद सावंत म्हणाले. देशातील ज्या जनतेचा लोकशाहीवर विश्वास आहे ती जनता शिवसेनेच्या पाठिशी उभी राहिल, असं अरविंद सावंत म्हणाले. शिवसेना नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. शिवसेना हे आमच्या बापाचं नाव आहे, ते कुणीही आलं तरी काढून घेऊ शकणार नाही, असं अरविंद सावंत म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेनं उद्धव ठाकरेंना कुटुंबप्रमुख मानलंय. निवडणूक आयोगाकडून जे चिन्ह दिलं जाईल ते राज्याची जनता स्वीकारेल, असं अरविदं सावंत म्हणाले. निवडणूक आयोगाचा जो निर्णय आला त्याला न्यायालयात आव्हान देण्याचा आमचा विचार असल्याचं अरविंद सावंत म्हणाले. अनिल देसाई काय म्हणाले? हा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आहे. आमच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात याबाबत भूमिका मांडली होती. परिशिष्ठ १० नुसार सुरु असलेल्या याचिका प्रलंबित असून त्याचा निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी होती. केंद्रीय निवडणूक आयोगानं निर्णय घेऊ नये, अशी आम्ही मागणी होती. सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला परवानगी दिली, त्यानंतर निवडणूक आयोगानं आज एकाच दिवसात हा निर्णय घेतला धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली आहे.