पालघर, डहाणूतील आणखी १५ मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात; सरकारी पातळीवर वर्षभर सुटकेचे प्रयत्नच नाहीत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 3, 2022

पालघर, डहाणूतील आणखी १५ मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात; सरकारी पातळीवर वर्षभर सुटकेचे प्रयत्नच नाहीत

https://ift.tt/f7FD8nW
मुंबई : पाकिस्तानी हद्दीत मासेमारी केल्याच्या कथित आरोपावरून पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा यंत्रणेने नुकत्याच पकडलेल्या डहाणूच्या सात मच्छिमारांशिवाय राज्यातील आणखी १५ मच्छिमारांची नावे ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे आली असून, ते सर्व जण पालघरच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील आहेत. हे सर्व जण गेले वर्षभर पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याचे स्थानिकांशी बोलताना स्पष्ट झाले. वर्षभरात त्यांच्या सुटकेबाबत सरकारी पातळीवर काहीही हालचाल झालेली नसून त्यांचे कुटुंबीय असहायपणे त्यांची वाट पाहत आहेत. पकडलेल्या मच्छिमारांपैकी बहुतेकजण घरातील तरुण आणि कर्ते आहेत. त्यांच्या अटकेमुळे कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यात पालघरमधील आणखी काही मच्छिमार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नौकेवर गेल्यानंतर पाकच्या ताब्यात गेल्या वर्षी २३ ऑक्टोबरला डहाणू तालुक्यातील जांबुगाव भिनारी बुजडपाडा येथून नरेंद्र रवींद्र बुजड (२०), संजय शिडवा ठाकरे (१७), किशोर उखडऱ्या मश्या (३०) हे तिघे, तर जळवाई बिजपाडा येथून अजय वसंत वाडू (२५) हे चौघे २७ ऑगस्ट, २०२१ रोजी पोरबंदर येथे मासेमारी बोटीवर कामासाठी गेले होते. यातील नरेंद्र आणि संजय हे एकाच कुटुंबातील आहेत. त्या वेळी श्रीपद्मणीकृपा (जीएच२५एमएम६५९) या राजेश भिकूभाई जुंगी यांच्या बोटीवरील चौघांना पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. आजतागायत त्यांच्याशी काहीही संपर्क नसल्याची माहिती जांबुगावमधील महिला वंदना जितेश पागी यांनी दिली. वंदना यांचे पती जितेश विक्या पागी यांच्या फोनवरच या चौघांना पकडल्याचा निरोप ६ नोव्हेंबर, २०२१ रोजी सर्वप्रथम बोटमालकाकडून आला होता. सध्या जितेश पागी पोरबंदर येथे मासेमारीसाठी गेले आहेत. डहाणू तालुक्यातील जांबुगाव येथील चार मच्छिमारही गेल्या वर्षी २५ ऑगस्टला ओखा येथील बजरंग (जीजे११एमएम९००) या बोटीवर मासेमारीसाठी गेले होते. या बोटीसह त्या चौघांनाही पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. प्रमेल रमण पाचलकर (२४), राजू रमण वरठा (३३), सुभाष लाडक्या वरठा (४४), सचिन वसन लहांग्या (२३) अशी त्यांची नावे आहेत. तलासरी तालुक्यातील वरवाडा गुंदनपाडा येथील राजेश बाबू वळवी (३३), उपलार हरपालपाडाचे सुरेश रत्ना हरपाले, कोजाई पाटीलपाडा येथील जितू जयवंत पाचलकर (२४) आणि जयवंत जाना पाचलकर (४८), तर अनविर डोंगरीपाड्याचे राजेश सवला वळवी (४५), नवीन सवला वळवी (२८), संद्री प्रभू हरपाले (१९) या एकूण सात मच्छिमारांना गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला पोरबंदरहून मासेमारी करण्यासाठी गेलेल्या बोटीसह पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. यातील राजेश आणि नवीन हे भाऊ, तर जयवंत आणि जितू हे पिता-पुत्र आहेत. रहिवासी दाखले सादर या सर्व मच्छिमारांच्या नातेवाइकांनी त्यांची छायाचित्रे आणि रहिवासी दाखले पोलिसांकडे सादर केले असल्याचे या नातेवाइकांचे म्हणणे आहे; तसेच ही कागदपत्रे त्यांनी बोटमालकांनाही दिली असून, ती त्यांनी गुजरात सरकारकडे सादर केली असावीत, अशी त्यांची अपेक्षा आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार बेकायदा सागरी हद्द ओलांडल्याबाबत खटला चालवला जातो आणि स्थानिक न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगावी लागते. ही शिक्षा तीन महिने ते सहा महिन्यांपर्यंत असू शकते. ही शिक्षा भोगून आणि नागरिकत्व सिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एक महिन्याच्या आत कैद्यांना सोडण्याची तरतूद उभय देशांतील करारात आहे, तरीही शिक्षा पूर्ण केलेले पाचशेहून अधिक मच्छिमार अद्यापही पाकिस्तानच्या कराची येथील तुरुंगात असून, त्यांचा करोनाकाळापासून गेली दोन वर्षे कुटुंबाशी काहीही संपर्क नाही. त्यातील बरेच जण आजारी आहेत. त्यांची मदतीची याचना करणारी ऑडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली होती. या संदर्भातील वृत्त नुकतेच ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दिले होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात पाकिस्तानने पकडलेल्या डहाणूच्या सात मच्छिमारांसह १६ जणांची माहिती २९ सप्टेंबरला भारतीय राजदूतांनी पाकिस्तानकडे सुपूर्द केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यादी पडताळून पाहण्याची गरज गेले वर्षभर १५ जण परदेशातील तुरुंगात असूनही राज्य सरकारला याची खबरही नाही. त्यांच्या सुटकेचे प्रयत्नही झालेले नाहीत. दर १ जुलैला पाकिस्तान आणि भारत त्यांच्या ताब्यात असलेल्या एकमेकांच्या देशातील कैद्यांची यादी परस्परांकडे सुपूर्द करतात. त्या यादीत वरील मच्छिमारांची नावे आहेत का, हे सरकारी पातळीवर पडताळून पाहणे आवश्यक असून, त्यानुसार त्यांच्या ओळखपत्रांसंदर्भातील कागदपत्रे सादर करून नागरिकत्व सिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू करणे शक्य होणार आहे.