आरोग्य उपसंचालकांची सरप्राइज भेट ठरली, पण रुग्णालयात आले अन् हारतुरे स्वीकारून गेले! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 15, 2022

आरोग्य उपसंचालकांची सरप्राइज भेट ठरली, पण रुग्णालयात आले अन् हारतुरे स्वीकारून गेले!

https://ift.tt/3vXnbS0
सोलापूरः सोलापूर-राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू होताच महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. जनतेला आरोग्य सुविधा सहजपणे कशा पद्धतीने उपलब्ध होतील याकडे लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य खात्यातील वरीष्ठ डॉक्टर सरकारी रुग्णालयात रात्री अपरात्री सरप्राईज भेटी देत रुग्णांच्या समस्या जाणून घेत आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवा पुणे मंडळ येथील आरोग्य उपसंचालक डॉ संजोग कदम हे शुक्रवारी रात्री अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाला भेट देण्यासाठी आले होते. पण अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने हारतुऱ्यांनी व वाजतगाजत डॉ संजोग कदम यांचं स्वागत केलं.त्यामुळं सरप्राईज भेट बाजूला राहिली आणि उपसंचालक डॉ. संजोग कदम यांचं जंगी स्वागताचा कार्यक्रमच करण्यात आला. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी तर फटाक्यांची माळ देखील आणली होती. या सर्व प्रकार सध्या जिल्ह्यात चर्चेत आहे.

अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात थाटामाटात स्वागत

स्वामी समर्थांची नगरी आणि सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका म्हणून अक्कलकोट तालुक्याची ओळख आहे. अक्कलकोट शहरातील मुख्य ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आपली सेवा बजावत आहे. या ग्रामीण रुग्णालयाचा चार्ज डॉ अशोक राठोड यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात दिला आहे. डॉ अशोक राठोड यांची मुळ नियुक्ती मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्याचे आरोग्य उपसंचालक डॉ संजोग कदम हे अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली. डॉ अशोक राठोड हे मंद्रुप ग्रामीण रुग्णालय येथून अक्कलकोटकडे रवाना झाले. स्वागताची संपूर्ण तयारी केली. शुक्रवारी रात्री डॉ संजोग कदम अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल होताच त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. वाचाः

सरप्राईज भेट बाजूलाच राहिली, स्वागत समारंभात वेळ गेला

डॉ संजोग कदम यांना खुष करण्यासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरू होती. मोठी फटाक्यांची माळ उडवण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा याबाबत माहिती घेण्यासाठी आलेले उपसंचालक डॉ संजोग कदम स्वागत समारंभात रमून गेले. सरप्राईज भेट बाजूला राहिली गेली. तसेच डॉ अशोक राठोड हे मंद्रुप वरून येताना मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आले होते. नुकताच काही दिवसांपूर्वी परिपत्रक पारित झाले होते की, वरिष्ठांच्या परवानगीशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. पण शुक्रवारी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अशोक राठोड यांनी स्वतः मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आणून स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात जुंपले होते. वाचाः