
यवतमाळ : युती,आघाडीमध्ये कुठल्या एका पक्षाला जागा सुटते. त्यानंतर कायम त्याच पक्षाच्या उमेदवाराचा तिथे दावा असतो. त्यामुळे उमेदवार नसलेल्या पक्षाचे कार्यकर्ते टिकत नाही. परिणामी पक्ष संपतो. ही बाब आता प्रत्येक पक्षांनी लक्षातही घेतली आहे. स्वतंत्र निवडणुका लढविल्या तरच पक्ष टिकतील, असे मत वंचित बहूजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. भाजपला उद्धव ठाकरे नको होते त्याप्रमाणं एकनाथ शिंदे नको आहेत. भाजपला त्यांच्याबाजूनं स्थिती दिसली तर ते निवडणूक लावतील,असं ते म्हणाले. स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वंचित बहूजन आघाडीच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी ते यवतमाळात आले होते. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात त्यांनी चर्चा केली. ८० टक्के बांधणीचे काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर त्याचे स्वागत करू, असे ते म्हणाले. युती, आघाडीने पक्षांचे नुकसान होत असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. काही मतदारसंघात पूर्णपणे पक्ष संपलेला असल्याचे पक्षांना दिसले. लोकशाहीला टिकविण्यासाठी राजकीय पक्षांची गरज आहे. राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढले तरच टिकतील. युतीमध्ये वारंवार एकाच पक्षाला जागा सुटते, त्यामुळे इतर पक्षाचे कार्यकर्ते टिकत नाही, असे ते म्हणाले.तसेच बाजार समिती कायद्यात दुरुस्ती करावी, हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी होत असेल तर त्या मालाची खरेदी बाजार समितीने करावी, त्यासाठी रिझर्व फंड वापरण्याची शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.अँड. शासनाचे धोरण चुकीचे अतिपावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. शासनाने सप्टेंबरपर्यंतचे नुकसानच ग्राह्य धरले व मदत दिली असल्याचे स्पष्ट केले. मात्र ऑक्टोबर महिन्यातही पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान केले. मात्र सरकार आता मदत देण्याचा प्रश्न येत नाही, असे सांगत आहे. त्यामुळे शासनाचे हे धोरण चुकीचे आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे,.असे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.