सलग दुसऱ्या दिवशी हत्या झाल्याने अकोला हादरले; युवकावर अज्ञाताचा हल्ला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 1, 2022

सलग दुसऱ्या दिवशी हत्या झाल्याने अकोला हादरले; युवकावर अज्ञाताचा हल्ला

https://ift.tt/6VxAhYo
अकोला : शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सातत्याने प्राणघातक हल्ले, हत्येच्या घटना सुरू आहेत. नवीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासमोर अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान उभे ठाकले. रविवारी सायंकाळी शिवसेना उपशहर प्रमुखाच्या हत्येच्या घटनेची शाई वाळत नाही, तोच सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जुने शहरातील भांडपुरा चौकात एका ३० वर्षीय युवकाची धारदार तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने अकोला शहरात खळबळ उडाली आहे. अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्यातर्गंत येणाऱ्या भांडपुरा चौक परिसरातील अन्वरी मशिदीजवळच्या हमजा प्लॉटमध्ये अमीन खान रशिद खान (वय, ३० रा. भगतवाडी) या युवकावर एका अनोळखी इसमाने पूर्व वैमनस्यातून धारदार तलवारीने अचानक हल्ला चढविला. अमीन याचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. अनोळखी हल्लेखोराने अमीन खान याच्या मानेवरच घाव घातल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. गंभीर जखमी अमीनला रक्ताच्या थारोळ्यात पाहून हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेतच अमीन खान याला नागरिकांनी सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेते. परंतु याठिकाणी डॉक्टरांनी त्याची तपासणी करून तो मरण पावल्याचे सांगितले. शिवसेनेचे शहर उपप्रमुख विशाल कपले यांच्यावर दोघांनी चाकूने हल्ला करून रविवारी सायंकाळी त्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. त्या घटनेची शाई वाळली नाही, तोच २४ तासांत पुन्हा जुने शहरात युवकाच्या हत्येची घटना घडली. दरम्यान, २६ ऑक्टोबरला रात्री वाइनबारचे मालक नितीन शहाकार यांच्यावर प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.