मोबाइलसाठी महिलेला रिक्षासह फरफटत नेले, मुंबईतील धक्कादायक प्रकार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 18, 2022

मोबाइलसाठी महिलेला रिक्षासह फरफटत नेले, मुंबईतील धक्कादायक प्रकार

https://ift.tt/z9iolN2
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मोबाइल हिसकावण्यासाठी महिलेला रिक्षासह फरफटत नेणाऱ्या तीन चोरांना मालाडच्या बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. मोबाइल हिसकावताना महिलेने तो घट्ट पकडल्याने रिक्षातून आलेल्या चोरांनी तिला काही अंतर फरफटत नेले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. अटक करण्यात आलेले तिघेही सराईत मोबाइल व सोनसाखळीचोर असल्याचे तपासातून उघड झाले आहे. मालाड पश्चिम लिंक रोड येथून ९ नोव्हेंबरला आयशा कुरेशी या कामावरून घरी परतत होत्या. रस्त्याच्या कडेने चालताना त्यांच्या हातामध्ये आयफोन होता. यावेळी पाठीमागून रिक्षातून आलेल्या तरुणाने हा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र आयशा यांनी तो घट्ट पकडल्याने पहिल्या प्रयत्नात त्यांना फोन घेता आला नाही. मात्र चोरांनी हात न सोडल्याने काही अंतर त्या रिक्षासोबत फरफटत गेल्या आणि खाली कोसळल्या. यावेळी मोबाइल दूरवर फेकला गेला व चोरांनी मोबाइल घेऊन पळ काढला. या घटनेत किरकोळ इजा झालेल्या आयशा यांनी बांगूरनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. घटनेचे गांभीर्य पाहून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय सरोळकर यांच्या पथकाने या चोरांचा शोध सुरू केला. घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील जवळपास २५ ते ३० सीसीटीव्ही फुटेजची झाडाझडती पोलिसांनी घेतली. फुटेजमध्ये मिळालेले अस्पष्ट चेहरे पोलिसांनी परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये दाखवले. त्यांच्या देहबोलीवरून दोघांना ओळखत असल्याची माहिती एका खबऱ्याने कॉन्स्टेबल संतोष देसाई यांना दिली. त्यानुसार सरोळकर यांच्यासह भोसले, पाटील, चव्हाण, दळवी यांच्या पथकाने सापळा लावून अमीन अब्दुल खान, अब्दुल शकरूल्ला साह आणि तबरेज सलीम कुरेशी या तिघांना अटक केली. अमीनविरुद्ध १२ गुन्हे दाखल असून, अब्दुलचा वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतील आठ गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. नशा आणि चोरीची वाहने अमीन, अब्दुल आणि तबरेज हे गुन्हे करण्यासाठी चोरीच्या वाहनांचा वापर करीत. या गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही त्यांनी चोरलेली होती. गुन्हा करण्यापूर्वी हे सर्व एकत्र भेटत. नशा करत आणि आधी वाहन चोरून नंतर त्यातून सोनसाखळी किंवा मोबाइल हिसकावत, असे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.