
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः खार रोड स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या पादचारी पुलाच्या फलाट क्रमांक-१ व २वर उतरणाऱ्या पायऱ्या बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. स्थानक सुधारणेच्या कामासाठी स्थानकात डेक उभारण्याचे काम करण्यात येणार असल्याने आज, २३ डिसेंबरपासून या पायऱ्या बंद करण्यात येणार आहेत. फलाटांवरील गर्दी विभागण्यासाठी हे डेक उभारण्यात येणार आहे. यावर स्टॉल आणि अन्य सुविधा असणार आहेत. याचे काम सुरू करण्यासाठी फलाट क्रमांक-१ ते ३दरम्यान पुलांवरील छत आणि फलाट क्रमांक १-२वरील पादचारी पुलाच्या उत्तर दिशेकडील पायऱ्या तोडण्यात येणार आहेत. आजपासून हे तोडकाम सुरू करण्यात येणार आहे. पुलाच्या दक्षिणेला आणि स्थानकातील अन्य पुलाच्या दोन्ही दिशेकडील पायऱ्या प्रवासी वापरासाठी खुल्या असणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील सुधारणा कामे हाती घेण्यात आली आहेत. सर्व फलाटांसह सरकते जिने आणि लिफ्ट यांची जोडणी असलेला प्रशस्त डेक उभारण्यात येणार आहे. खार रोडसह मध्य रेल्वेवरील १० आणि पश्चिम रेल्वेवरील आठ रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा करण्याचे 'एमआरव्हीसी'चे नियोजन आहे. होणार या सुधारणा... - १० मीटर रुंदीचा प्रशस्त डेक - डेकवर तिकीट बूकिंग कार्यालय - २२.५ मीटर डेकवर सर्व पुलांची जोडणी - प्रवाशांसाठी डेकवर स्वच्छतागृहे - स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या पादचारी पुलाचा विस्तार - स्थानकातील ४.५ मीटर पादचारी पुलाच्या जागी सहा मीटरचा पूल - चर्चगेट टोकाला सात मीटर रुंदीचा पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा स्कायवॉक