
मटा विशेष, मुंबई : भारतीय रेल्वेतील पहिलीच वातानुकूलित लोकल मुंबईत यशस्वी ठरत असतानाच, एसी लोकलच्या मदतीने पर्यावरणपूरक आणि वीजबचत करण्याच्या दिशेने मुंबई रेल्वे विकास महामंडळाने वाटचाल सुरू केली आहे. एमयूटीपी प्रकल्पातील २३८ एसी लोकलची ॲल्युमिनियममध्ये बांधणी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून, तसा प्रस्ताव 'एमआरव्हीसी'ने रेल्वे मंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. यामुळे रेल्वेगाडीचे वजन कमी होऊन सुमारे आठ टन कार्बन उत्सर्जन घटणार आहे. यामुळे ही लोकल पर्यावरणालाही पूरक ठरणार आहे. 'शून्य लोकल अपघात' ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी एसी लोकलची भूमिका मोठी आहे. विकसित देशांत वातानुकूलित रेल्वेगाड्या ॲल्युमिॲनियम बनावटीच्या आहेत. या लोकलमध्ये विद्युत यंत्रणा खालील भागात असल्याने यातील आसनक्षमतेत देखील वाढणार आहे. यामुळे मुंबईकरांना वाढीव आसनांच्या लोकलमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा, आरामदायी आसने यांचा यात समावेश करण्यात आलेला आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये मध्य आणि पश्चिम मिळून सुमारे २५० लोकल गाड्या धावतात. या गाड्या स्टीलच्या आहेत. या गाड्या रोज सरासरी ४५० किमी धावतात. यांचे वार्षिक वीज बिल सुमारे ५०० कोटी रुपये आहे. ॲल्युमिनियममध्ये या गाड्यांची बांधणी झाल्यास वर्षाचे बिल साधारण प्रतिवर्ष ४६० ते ४७० कोटी रुपये अपेक्षित आहे. यामुळे सुमारे ३०-४० कोटींची बचत अपेक्षित आहे. स्टीलमधील रेल्वे गाड्यांचे आयुर्मान २५ वर्षे असून, ॲल्युमिनियम बांधणीतील रेल्वे गाड्यांचे आयुर्मान ३५ वर्षे आहे, असा दावा वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचा आहे. ॲल्युमिनियम धातूतील रेल्वेगाड्या वजनाने हलक्या असतात. कमी विजेच्या मदतीने यांचे परिचालन शक्य आहे. प्रवासी सुरक्षेच्या निकषातही या गाड्या उजव्या ठरत आहेत. यामुळे शयन आणि आसन श्रेणीतील २०० वंदे भारत एक्स्प्रेस ॲल्युमिनियममध्ये बांधण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तर ऑक्टोबरमध्ये ॲल्युमिनियम बांधणीतील पहिल्या मालगाडीचा समावेश रेल्वे ताफ्यात करण्यात आलेला आहे. मेट्रोचाही समावेश मेल-एक्स्प्रेस, मालगाडी, उपनगरी रेल्वे त्यानंतर मेट्रोची देखील ॲल्युमिनियममध्ये बांधणी करण्यात येणार आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमानुसार अशी पहिली मेट्रो धावण्याचा मान पुणे शहरात मिळाला आहे. उपनगरी लोकल ५०० कोटी - स्टेनलेस स्टील एकूण २५० लोकलचे वीज बिल ४६०-४७० कोटी - ॲल्युमिनियम एकूण २५० लोकलचे वीज बिल ३०/४० कोटी - प्रतिवर्ष बचतीचा अंदाज ४५० किमी - लोकलची रोजची सरासरी धाव ८ टन - रेल्वेगाडीचे वजन १०० किलोने कमी केल्यास कार्बन उत्सर्जन बचत शक्य