ई वाहने खरेदी करणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा; ई-चार्जिंगसाठी लवकरच ३३० केंद्रे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 5, 2023

ई वाहने खरेदी करणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा; ई-चार्जिंगसाठी लवकरच ३३० केंद्रे

https://ift.tt/5sFv63I
मुंबई : ई वाहने खरेदी करणाऱ्या मुंबईकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या दोन महिन्यांत मुंबई शहरात तब्बल ३३० ई-चार्जिंग स्टेशन कार्यान्वित होणार आहेत. या स्टेशनवर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा असल्याने ई-वाहन खरेदी करणाऱ्यांचा मार्ग सुकर होणार आहे. ई वाहनांच्या चार्जिंगसाठी पुरेशी केंद्रे उपलब्ध नसल्याने आजदेखील पेट्रोल-डिझेल इंधनाच्या वाहनांना पसंती मिळत आहे. नागरिकांना इमारत-घराच्या परिसरात आणि कार्यालयीन ठिकाणांजवळ ई वाहन चार्जिंग करता यावे, यासाठी बेस्टने ३३० चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम हाती घेतले आहे. यापैकी अनेक ठिकाणी निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून मार्चपर्यंत सर्व चार्जिंग स्थानके कार्यान्वित होतील, असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. तीन चाकी, चार चाकी, व्हॅन, बस अशा सर्व वाहनांना चार्जिंग करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. बेस्ट बसेसह ही केंद्रे सार्वजनिक वापरासाठीदेखील खुली असतील. या केंद्रांवर माफक दरात वाहन चार्ज करता येणार आहे, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली. बोरिवली नॅन्सी कॉलनीतील एसटी थांब्यासह रेल्वे स्थानक परिसरात चार्जिंग स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. सुविधा कुठे? कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, वडाळा, वांद्रे, प्रतीक्षा नगर, धारावी, महेश्वरी उद्यान, सांताक्रूझ, देवनार, शिवाजी नगर, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, कुर्ला, मरोळ, दिंडोशी, मागाठाणे, गोरेगाव, ओशिवरा, मालवणी, पोईसर, गोराई, मालाड, बॅकबे आणि आणिक अशा एकूण २६ आगारांत एकूण ३३० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.