
नवी दिल्ली: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता अन्नू कपूरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अन्नू कपूर यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अन्नू कपूर यांना चेस्ट कन्जेशन झालं होत. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सकाळीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. अन्नू कपूर यांना २६ जानेवारीला सकाळी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. अजय (व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष) यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्नू कपूर यांना छातीत त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर कार्डिओलॉजीस्ट डॉक्टर सुशांत उपचार करत आहेत. यावेळी अन्नू कपूरची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.कोण आहेत अन्नू कपूर?अन्नू कपूर यांचा जन्म २० फेब्रुवारी १९५६ रोजी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये झाला. अन्नू कपूरचे वडील मदनलाल कपूर पंजाबी होते. तर त्यांची आई कमला या बंगाली होत्या. अन्नू कपूरचे वडील एक पारशी थिएटर कंपनी चालवत असत, जी शहरा-शहरात जाऊन गल्लीबोळात नाटक करत असे. तर, त्यांची आई कवयित्री होत्या. त्याशिवाय, त्यांना शास्त्रीय नृत्याची आवडही होती. अन्नू कपूर यांचे कुटुंब खूप गरीब होते. आर्थिक अडचणींमुळे अन्नू कपूर हे शिक्षण घेऊ शकले नाही. तर ते लहानपणीच वडिलांच्या थिएटर कंपनीत कामाला लागले. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांनी खूप मेहनत घेतली आणि अभिनयाचे धडे गिरवले.अन्नू कपूर यांनी वयाच्या २२-२३ व्या वर्षी एका नाटकात ७० वर्षांच्या वृद्धाची भूमिका निभावली. इथूनच त्यांचं नशीब चमकलं. हे नाटक पाहण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल आले होते. अन्नू कपूर यांच्या कामाने हे इतके प्रभावित झाले की त्यांनी अन्नू कपूरला एक पत्र लिहिले, त्यात त्यांचं खूप कौतुक केलं आणि त्यांना भेटायला बोलावलं. अन्नू कपूर यांनी १९७९ मध्ये त्यांच्या करिअरला सुरुवात केली. मंडी हे त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते. अन्नू कपूर हे उत्तम अभिनेते होते, त्याशिवाय ते त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठीही ओळखले जातात. त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. त्यांना 'विकी डोनर' या चित्रपटासाठी फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते ९२.७ रेडिओ एफएमवरील 'सुहाना सफर विथ अन्नू कपूर' या शोच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत.