
मुंबई: भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर सातत्याने टीकास्त्र सोडणारे ठाकरे गटाचे खासदार यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना डिवचले आहे. सोमवारी म्हणजे २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यानिमित्ताने ठाकरे गटाकडून मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. याची चुणूक शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या रविवारच्या अंकात पाहायला मिळाली. 'सामना'च्या आजच्या अंकात पहिल्या पानावर एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. संजय राऊत आणि यांनी ही जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमध्ये शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणत त्यांच्यावर जळजळीत टीका करण्यात आली आहे. साहेब मी गद्दार नाही!गेलेल्या ४० गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र..., असा मजकूर या जाहिरातीमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचे नेते या टीकेला प्रत्युत्तर देताना आक्रमक होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या ४० आमदारांसह उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यापासून ते सातत्याने बाळासाहेब ठाकरे हे आपले श्रद्धास्थान आहेत, हे ठसवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि वारसा पुढे नेत आहोत, असे शिंदे गटाकडून सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर शिंदे गटाने आपल्या पक्षाचे नाव 'बाळासाहेबांची शिवसेना' असे ठेवले आहे. परंतु, आता राऊत बंधुंनी शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा एकदा गद्दार संबोधून राजकीय वादाला तोंड फोडले आहे. या मुद्द्यावरुन आता शिंदे गट आणि ठाकरे गटात द्वंद्व पाहायला मिळण्याची शक्यता आहे.