कटलेला पंतग काढण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याची आयुष्याची दोर कटली, विजेचा शॉक लागून मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 29, 2023

कटलेला पंतग काढण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याची आयुष्याची दोर कटली, विजेचा शॉक लागून मृत्यू

https://ift.tt/dcSG1xi
औरंगाबाद : शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करून घरी पंतग खेळण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. उच्चदाबाच्या विद्युत वाहिनाचा शॉक लागल्याने उपचारादरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यु झाला. इक्रामोद्दीन इरफानोद्दीन सय्यद वय -९ (रा.आलम कॉलनी, औरंगाबाद) असे मृत शाळकरी मुलाचे नाव आहे. इक्रोमोद्दीन हा एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दुसरीचा विद्यार्थी होता. २६ जानेवारीला सकाळी ध्वजारोहण करण्यासाठी तो शाळेत गेला. सकाळी साडेअकराच्या सुमारास तो शाळेतून परतला. इक्रामोद्दीन हा त्याचा मावस भाऊ अब्दुल रहेमान अब्दुल माजेद (वय-७) याच्यासह घराच्या छतावर पंतग उडवण्यासाठी गेला. घरावरून विजेच्या डिपीला जाणारी उच्चदाबाची विद्युत वाहिनी आहे. या विजेच्या तारेत इक्रामोद्दीन याचा पतंग अडकला. त्याने पतंग खेचल्याने विजेची तार खाली येऊन पडली. यात दोघांनाही विजेचा जबर शॉक लागला. ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर दोघांनाही उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास इक्रामोद्दीनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इक्रामोद्दीनचे वडील चालक आहेत. त्याला दोन भावंडे आहेत. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. या दोन्ही घटनांमध्ये लहान मुलांनी जीव गमावला आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.