Pune Crime : तुझ्या भावाला आज मारणार; पुण्यात २० वर्षीय तरुणाला संपवलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 6, 2023

Pune Crime : तुझ्या भावाला आज मारणार; पुण्यात २० वर्षीय तरुणाला संपवलं

https://ift.tt/5fq6jGl
पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून एका २० वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना इंदापूरमध्ये उघडकीस आली आहे. प्रणव नानासो करे (वय २०, रा. करेवाडी, ता. इंदापूर ) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी ४ जानेवारीला ही घटना इंदापूर शहराजवळील सातपुते वस्ती कॅनल जवळ घडली. या संदर्भात मृत युवकाचा भाऊ प्रतिक नानासो करे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून राजकुमार पवार, इरफान शेख (दोघेही रा. इंदापूर), फरदिन मुलाणी (रा. वडापूरी ता.इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, ४ जानेवारी रोजी फिर्यादी हे घरी असताना दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान त्यांना राजकुमार पवार याचा फोन आला. त्याने तुझ्या भावाला आज आम्ही मारणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी सातपुते वस्तीवर अपघात झाल्याचा फोन आला. तिथे जाऊन पाहिले असता प्रणवची गाडी पडलेली होती. त्या ठिकाणी राजकुमार पवार व त्याचे मित्रही उपस्थित होते. त्यांनतर प्रणव यास दवाखान्यात उपचारासाठी नेल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र, डॉक्टरांनी प्रणवला मृत झाल्याचे घोषित केले. दरम्यान, इंदापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाल्यानंतर मृत युवकाच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. रात्री उशिरा राजकुमार पवार, फरदीन मुलाणी, इरफान शेख यांनी जुन्या भांडणाच्या रागातून जीवे मारल्याची फिर्याद दिल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे हे करीत आहेत.